Chandrapur Flood : चारवेळा पुराच्या पाण्याखाली आली पिके, चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळ्याच्या शेतकऱ्याची आत्महत्या, आठवड्याभरात तिसऱ्या पूरग्रस्ताचा बळी
शेकडो शेतकऱ्यांचं या पुरात नुकसान झालं. पेरलं ते उगवलं. पण, पुरानं निस्तनाबूत केलं. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकरी पार खचून गेला.
चंद्रपूर : कधी नव्हे तो यंदा पुराने चंद्रपूरवासीयांना त्रस्त केले. कित्तेक दिवस पुराखाली पिके आलीत. कापूस, सोयाबीनचं होत्याचं नव्हतं झालं. जिल्ह्यात पुराने खचलेल्या शेतकऱ्यांचं मृत्यूला कवटाळण्याचं सत्र सुरूच आहे. चुनाळा येथील तरुण शेतकऱ्यानं (Farmer at Chunala) आत्महत्या केली. या आठवठ्यात चंद्रपूर जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची तिसरी आत्महत्या आहे. रवींद्र नारायण मोंढे (Ravindra Mondhe) (वय 45) याने आज दुपारी आपल्या राहते घरी गळफास लावला. सतत चारदा पाण्याखाली शेतपिक आले. घरचा कर्ताच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सेवा सहकारी संस्थेतून (Seva Co-operative Society) शेतीकरिता सत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज उचल केली होती. त्यातून शेतात कपाशी व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती.
वर्षभरापूर्व वडील गेले आता अमित
चंद्रपूर जिल्ह्यात अमित मोरे नामक 22 वर्षीय युवा शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन शेतातच आत्महत्या केली. ताज्या पुराच्या संकटाने संपूर्ण शेतीच खरवडून गेल्याने खचलेल्या शेतकऱ्याने जीवन संपविले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातील कवीठपेठ स्वतःच्या शेतात त्याने दहा एकर शेतीमध्ये सोयाबीन- मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. कर्ज व बुडीत शेतीमुळे वडिलांनी देखील वर्ष आधी आत्महत्या केली होती. मात्र अमितने निराश न होता मोठ्या भावाच्या मदतीने शेती करून कुटुंबाला हातभार लावला होता. मात्र ताज्या पुराच्या संकटाने दोन लाख रुपये कर्ज असलेला हा शेतकरी खचला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आठवड्याभरातील तिसरी आत्महत्या
शेकडो शेतकऱ्यांचं या पुरात नुकसान झालं. पेरलं ते उगवलं. पण, पुरानं निस्तनाबूत केलं. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकरी पार खचून गेला. 25 जुलै रोजी वरोरा तालुक्यातील मुरदगाव येथे प्रफुल्ल भोयर (35) या तरुण शेतकऱ्यांने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. तर 23 जुलै रोजी राजुरा तालुक्यातील कविठपेठ येथे अमित मोरे (22) या तरुण शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. या दोन जणांच्या आत्महत्येच्या घटना ताज्या असताना आता तिसरा शेतकरी हे जग सोडून गेला.