अकोला जिल्ह्यातल्या दानापूरच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम, गल्लीबोळातील सर्व भिंती बोलक्या स्वरूपात
मोबाईल, लॅपटॉप किंवा नेटवर्कची सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी येते. असं होऊ नये म्हणून अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चातून गावातील घरांच्या भिंतीवर शैक्षणिक फलक तयार करू घेतलेत.
अकोला : मोबाईल, लॅपटॉप किंवा नेटवर्कची सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी येते. असं होऊ नये म्हणून अकोला जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चातून गावातील घरांच्या भिंतीवर शैक्षणिक फलक तयार करू घेतलेत. गावातील सर्वच भिंती बोलक्या झाल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यास करणं अगदीच सोपं झालंय.
ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे मोबाईल, लॅपटॉप या तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नसते. कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक वातावरणाला पारखा झाला आहे. आतापर्यंत घेतलेली विद्यार्थ्यांवरील मेहनत वाया जावू नये म्हणून अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी चांगलीच मेहनत घेतलीय.
इयत्ता 1 ते 8 च्या पाठ्यक्रमाचे गल्ली बोळात 200 शैक्षणिक चार्ट
दानापूर येथील शिक्षकांनी स्वखर्चातून कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी गावातील घरांच्या भिंती बोलक्या केल्या. यासाठी इयत्ता 1 ते 8 च्या पाठ्यक्रमाचे गल्ली बोळात 200 शैक्षणिक चार्ट चित्रकाराकडून रेखाटन करून घेतले. यामुळे चालता बोलता शिक्षण सुविधा उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीला गतिमानता आली आहे. जिल्हा परिषद शाळेसह गावातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे.
गावातील जवळपास 1000 विद्यार्थ्यांना उपक्रमाचा फायदा
यामध्ये गावाची विभागणी 4 भागात करण्यात आलीय. स्थानिक शिक्षकांनी कोविड नियम लक्षात घेऊन अध्यापनासाठी विद्यार्थ्यांसाठी गल्लीबोळातील शैक्षणिक चार्ट तयार केले. यातून शिक्षण सुरु असून या उपक्रमाचा फायदा गावातील जवळपास 1000 विद्यार्थी घेत आहेत. या उपक्रमासाठी शिक्षकांनी 45 हजार रुपये स्वतः गोळा केले.
विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाची गोडी
यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाची गोडी लागली आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या या बोलक्या भिंतीच्या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडलाच नाही. विद्यार्थ्यांमध्ये कोरोना काळात शिक्षणाची आणखीच गोडी निर्माण झाली आहे. विद्यार्थी गावातील कुठल्याही गल्लीबोळात फिरत असला तरी त्याला त्याच्या अभ्यासक्रमाचा चार्ट डोळ्यापुढं येतो आणि तो अभ्यास करू लागतो.
बोलक्या भिंतीचा उपक्रम यशस्वी ठरल्याने पालक समाधानी
कोरोना महामारी आली आणि शाळा बंद झाल्या. यामुळे पालकांमध्ये आपल्या पाल्याबद्दल शिक्षणाची चिंता वाढली होती. काही पालकांची हलाखीची परिस्थिती असल्यानं मोबाईल घेता येत नव्हता, तर कुठे नेटवर्कची सुविधा नव्हती. अशात दानापूरच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला बोलक्या भिंतीचा उपक्रम यशस्वी ठरल्याने पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबद्दल निश्चित झाल्याचं दिसत आहेत.
हेही वाचा :
त्याचं चालणं संशयास्पद, घाईगडबडीत रेल्वेत शिरला, हातवारे करताना पोलिसांनी घेरलं, बॅग उघडताच नोटांचे अक्षरश: बंडल
शहिदांच्या कुटुंबीयांचे पाय धुतले, नंतर चांदीच्या ताटात प्रेमाने घास भरवला, बच्चू कडू यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन
विवाहितेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी अकोल्यात सासर-माहेरचे जमले, हाणामारीत 13 जण जखमी
व्हिडीओ पाहा :
Danapur ZP School teacher make wall painting for students in whole village Akola