कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा, बीड प्रशासन खडबडून जागं, बीडमध्ये एन्ट्री करायचीय? मग आधी अँटिजेन टेस्ट नंतरच एन्ट्री!
अन्य बाधित जिल्ह्यातून बीडमध्ये येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, असे आदेश बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बीड : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जातेय. त्याआगोदरच बीड जिल्हा आरोग्य प्रशासन खडबडून कामाला लागले आहे. अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारून अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी आजपासूनच करावी असे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. (Firtsly Corona Antigen Test And Then Entry In beed Dhananjay Munde order)
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी स्वतंत्र कोव्हिड सेंटर उभं करण्यात आलं आहे. त्यासाठी खाटा, ऑक्सिजन आणि परिपूर्ण मनुष्यबळाची सोय करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात 100 आयसीयूसह 660 खाटा उपलब्ध
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर मराठवाड्यातील बीड जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यातील निर्बंध हटविण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा वाढत असल्याने निर्बंध जैसे थे ठेवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात 100 आयसीयूसह 660 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
तब्बल सात ठिकाणी ऑक्सिजन प्लांट निर्मिती
बीडमध्ये 50 आणि अंबाजोगाईत 50 असे 100 आयसीयू खाटा तयार करण्यात आले आहेत. तसेच बीड 150, लोखंडी 150, अंबाजोगाई 100, केज व परळी 40, माजलगाव आष्टी व पाटोदा येथे प्रत्येकी 20 अशा 550 ऑक्सिजन खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात तब्बल सात ठिकाणी ऑक्सिजन प्लांट निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहेत.
लहान मुलांना सर्वाधिक धोका, पालकांनी काळजी घ्यावी
तिसरी लाट येण्याची मोठी शक्यता आहे. यात सर्वात मोठा धोका लहान बालकांना आहे. मात्र आपण काळजी घेतली तर या तिसरी लाटेवर मात करू शकतो असे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे सांगतातेय. लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर सोडल्यानंतर त्यांना व्यवस्थित मास्क लावूनच बाहेर सोडावे, शिवाय घरातील व्यक्ती बाहेरून आल्यानंतर लहान मुलांच्या सहवासात जाऊ नये कारण बाहेरून येणाऱ्या व्यक्तीकडून बालकांना अधिक संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.
बीडमध्ये सध्या लहान मुलांसाठी स्वतंत्र कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. मुलांना उपचारासोबतच मनोरंजन म्हणून खेळणी, पुस्तके, सायकलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोव्हीड काळात मुलांचे संगोपन करण्यासाठी 40 परिचरिकांना विशेष ट्रेंनिग देखील देण्यात आली आहे.
बाहेरून जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची आजपासून अँटिजेन टेस्टिंग
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली आहे. परंतु बीड जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने नियम शिथीलता मिळालेले नाही. जिल्ह्यात रुग्ण वाढीचा दर कमी व्हावा यासाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात तसेच नागरिकांनी घालून दिलेल्या मर्यादांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
आधी अँटीजन चाचणी, मगच बीडमध्ये प्रवेश
आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक असून, यावर उपाय म्हणून पोलीस खात्याच्या मदतीने नगर व अन्य बाधित जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट उभारुन अँटिजेन टेस्टिंग करून मगच प्रवेश देण्यात यावा, तसेच याची अंमलबजावणी आजपासूनच करावी असे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
(Firtsly Corona Antigen Test And Then Entry In beed Dhananjay Munde order)
हे ही वाचा :
कोरोनाची तिसरी लाट डेंजर, एकट्या मराठवाड्यात दररोज 1 लाख रुग्णवाढीचा अंदाज