Gulabrao Gawande : सेनेचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना 2 वर्षांची शिक्षा, वाहन थांबवणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणे भोवले!
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये दंड व कलम 294 अन्वये 2000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे.
अकोला : सेनेचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड सुनावला आहे. अकोला येथील अग्रसेन चौकात (Agrasen Chowk) तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातला होता. शासकीय कामात अडथळा (Obstruction of Government Work) आणल्याप्रकरणात गावंडे यांनी शिक्षा ठोठावण्यात आली. गुलाबराव गावंडे हे सध्या सेनेत नाहीत. ते आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. अकोला शहरातील अग्रसेन चौकात वाहतूक पोलीस कर्तव्यावर होते. वाहतूक पोलिस कर्मचारी संतोष गिरी (Santosh Giri) यांनी गावंडे यांचे वाहन थांबविले. ही घटना 16 डिसेंबर 1999 रोजी घडली. गुलाबराव गावंडे यांनी वाहन थांबवल्याच्या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. तसेच शिविगाळ केल्याची घटना घडली होती.
चौघांविरोधात गुन्हा
याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष गिरी यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी सेनेचे चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राजू मधुकर मेतकर, गजानन नामदेव बचे, हरिनारायण रामराव गावंडे यांचा समावेश होता. या प्रकरणातील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. गव्हाणे यांनी सबळ पुरावे आणि साक्षीदार तपासले.
तिघांची पुराव्याअभावी सुटका
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये दंड व कलम 294 अन्वये 2000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे. सरकारतर्फे अॅड. दीपक गोटे यांनी काम पाहिले. त्यांना सीएमएस सेलचे राम पांडे व पोलीस ठाण्याचे बळीराम चतारे यांनी सहकार्य केले आहे.
काय होतं प्रकरण
गुलाबराव गावंडे हे मंत्री होते. वाहतूक पोलिसानं त्यांची गाडी अडविली. त्यामुळं ते संतप्त झाले. मी मंत्री आहे. माझी गाडी कशी काय थांबविली. यावरून हा वाद झाला. वाहतूक पोलीसही इरेस पोहचला. त्यानं मंत्र्याविरोधात तक्रार करण्याची हिंमत दाखविली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयानं पुरावे तपासले. शेवटी गुलाबराव गावंडे दोषी ठरले. त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.