आधुनिक श्रावणबाळाला सलाम, खाटेची केली कावड; वडिलांच्या उपचारासाठी 18 किलोमीटर पायपीट, दुर्गम भागातील असुविधांचा मुद्दा ऐरणीवर
Gadchiroli Bhamragarh : नक्षलग्रस्त गडचिरोली भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी सुद्धा किती संघर्ष करावा लागू शकतो, याचे उदाहरण समोर आले आहे. वडिलांवरील उपचारासाठी मुलाला 18 किमीची पायपीट करत रुग्णालय गाठवे लागल्याचे समोर आले आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोलीतील नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी किती दिव्यातून जावे लागते, याचा विचार तुम्ही करु शकणार नाही. राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात अजून ही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. भामरागड तालुक्यातील एका उदाहरणावरुन ही भळभळती जखम पुन्हा समोर आली आहे. वडिलांवरील उपचारासाठी मुलाला 18 किमीची पायपीट करावी लागली. उपचारानंतर पण त्याच्या नशीबी आलेला असुविधांचा भोग काही सूटला नाही. तितकीच पायपीट करुन त्याला घरी परतावे लागले.
वडिलांवरील प्रेमाचे अनोखे उदाहरण
ही घटना आहे भटपार या गावातील. येथील मालू केये मज्जी हे 67 वर्षांचे नागरिक शेतात काम करताना घसरुन पडले. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली. पित्याची ही अवस्था मुलगा पुसू मालू मज्जी याला बघवली नाही. त्याने मित्राच्या मदतीने खाटेची (छोटी बाज) कावड केली. पावसाने या भागाला जोरदार तडाखा दिला आहे. चिखल तुडवूत आणि नदी-नाले पार करत त्याने भामरागड गाठले. तिथे वडिलांवर वैद्यकीय उपचार केले. त्यासाठी पुसू याने मित्रासह 18 किलोमीटरचा पायी प्रवास केला. त्याच्या या पितृप्रेमाचे सध्या कौतुक होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनावर तिखट प्रतिक्रिया येत आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सुद्धा हेलपाटेच लिहिले असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भटपार ते भामरागड
मालू केये मज्जी हे चिखलात घसरुन पडल्याने त्यांना चालणे, फिरणे पण कठीण झाले. वेदना पण कमी होत नव्हत्या. त्यांची ही तगमग मुलगा पुसू मज्जी याला पाहवल्या नाहीत. त्याने खाटेची कावड केली. त्यावर वडिलांना झोपवले. भामरागड शिवाय दुसरीकडे वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने त्याने वडिलांवर भामरागड येथे उपचाराची सोय केली. रस्त्यात त्यांना पामुलगौतम ही नदी लागली. ती पावसाने दुथडी भरून वाहत होती. पण पुसु आणि त्याच्या मित्रांनी हिंमत हारली नाही. त्यांनी नावेत खाट टाकून नदी पार केली. पुढे पुन्हा कावड खाद्यांवर घेतली आणि भामरागडचे ग्रामीण रुग्णालय गाठले. स्थानिक माध्यमांनी या दुरावस्थेची दखल घेतली आणि वृत्त प्रकाशित केले आहे.