वीजा चमकतात तेव्हा झाडाखाली थांबूच नका, दोन चिमुकल्यांसह आईवडील झाडाखाली थांबले आणि घात झाला !
लग्न समारंभाहून घरी परतत असताना अचानक पाऊस सुरु झाला म्हणून दुचाकीवरील कुटुंब झाडाखाली आश्रयाला गेले. मात्र हीच चूक त्यांना नडली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
व्यंकटेश दुडमवार, गडचिरोली : चारचौघांसारखं त्यांचाही सुखाचा संसार होता, हसतं खेळतं कुटुंब होतं. आपल्या दोन मुलींसह आपल्या संसारात ते दोघे खूप खूश होते. पण या सुखाला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक? नातेवाईकाचे लग्न म्हणून चौघेही नटून थटून बाईकवर बसून गेले. लग्न समारंभ आटोपला, नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्या. मग ते चौघे पुन्हा आपल्या बाईकवरुन परतीच्या प्रवासाला लागले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. परतीच्या प्रवासात असताना अचानक पाऊस आणि वीजांचा कडकडाट सुरु झाला. पावसापासून बचाव व्हावा म्हणून ते दोघे आपल्या दोन चिमुकल्यांना झाडाखाली आश्रयाला आले आणि इथेच घात झाला. त्याच झाडावर वीज कोसळली आणि एका सुखी संसाराचा आणि कुटुंबाचा जागीच दुर्देवी अंत झाला.
लग्नाहून घरी परतत असताना घडली दुर्घटना
वडसा तालुक्यातील आमगाव येथील भारत राजगडे हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह कुरखेडा येथे नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. लग्न समारंभ आटोपून चौघेही दुचाकीवरुन आपल्या घरी परतत होते. मात्र तुळशी फाट्याजवळ पोहचताच अचानक पाऊस सुरु झाला. यामुळे राजगडे कुटुंब पावसापासून वाचण्यासाठी दुचाकी रस्त्यात्या कडेला उभी करुन झाडाखाली थांबले. पण दुर्देवाने ज्या झाडाखाली ते थांबले होते त्याच झाडावर वीज कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
दुर्घटनेत अख्खं कुटुंब जागीच ठार
या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबच जागीच ठार झालं. स्थानिक नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यात गेले चार दिवस सातत्याने अवकाळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू आहे.