Akola Shiv Sena | अकोला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गोपाल दातकर यांची वर्णी, जिल्हा व शहर कार्यकारिणीतही होणार मोठे फेरबदल!
बाजोरिया यांनी जिल्ह्यासाठी एक नव्हे तर दोन जिल्हाप्रमुखांची गरज असल्याची मागणी पक्षाकडे रेटून धरली होती. नितीन देशमुख हे पूर्वीचे जिल्हाप्रमुख आहेत. आता गोपाल दातकर हे दुसरे जिल्हाप्रमुख झाले. यामुळं शिवसेनेला बळ मिळेल. याचा फटका आता भाजपला बसण्याची शक्यता आहे.
अकोला : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेता शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत मोठा फेरबदल केला जाणार आहे. विरोधकांना धोबीपछाड करण्याच्या उद्देशातून सेनेत एक नव्हे तर दोन जिल्हाप्रमुख असावेत. या मुद्द्यावरून पक्षांतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू होती. त्यानुषंगाने शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी गोपाल दातकर (Gopal Datkar) यांची वर्णी लागली आहे. याव्यतिरिक्त शहर कार्यकारिणीतही (City Executive) मोठे फेरबदल होणार आहेत. शिवसेनेतील माजी केंद्रीय मंत्री तथा पक्ष प्रवक्ता अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी 2016 मध्ये पश्चिम विदर्भाचे संपर्कप्रमुख पद स्वीकारले. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीत मोठा फेरबदल केला होता. श्रीरंग पिंजरकर यांना सहाय्यक संपर्कप्रमुख पदावर बढती देत जिल्हाप्रमुख पदाची सूत्रे आमदार नितीन देशमुख यांच्याकडे सोपवली होती. हा बदल पक्षाच्या पथ्यावर पडला.
नितीन देशमुख, गोपाल दातकर दोन जिल्हाप्रमुख
2019 मधील विधानसभा निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख नितीन देशमुख विजयी झाले. यादरम्यान पक्षात विधान परिषदेचे माजी सदस्य गोपीकिशन बाजोरिया व नितीन देशमुख यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचे समोर आले. डिसेंबर 2021 मध्ये पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. पक्षांतर्गत विरोधामुळेच पराभव झाल्याची भावना निर्माण झाली. बाजोरिया यांनी जिल्ह्यासाठी एक नव्हे तर दोन जिल्हाप्रमुखांची गरज असल्याची मागणी पक्षाकडे रेटून धरली होती. नितीन देशमुख हे पूर्वीचे जिल्हाप्रमुख आहेत. आता गोपाल दातकर हे दुसरे जिल्हाप्रमुख झाले. यामुळं शिवसेनेला बळ मिळेल. याचा फटका आता भाजपला बसण्याची शक्यता आहे.
सहाय्यक संपर्कप्रमुखपदी कोणाची वर्णी?
राज्यात शिवसेनेच्या विरोधात भाजपने मोर्चा उघडल्याची बाब ध्यानात घेण्यात आली. आगामी लोकसभा विधानसभा व निवडणुकीपूर्वी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. यात सहाय्यक संपर्कप्रमुखपदी कोणाची वर्णी? तर पक्षातील विद्यमान सहाय्यक संपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. मध्यंतरी त्यांनी जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात चांगलेच रान पेटवले होते. पक्षाचे सचिव तथा राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांच्याकडे पिंजरकर यांनी पक्षात फेरबदल करण्याची मागणी केली होती. या सहाय्यक संपर्कप्रमुखपदी कोणाची वर्णी लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.