शिर्डी: देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत. ते सत्यात कधी येईल हे माध्यमांनीच सांगावं?, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे.
शिर्डी येथे श्रीरामपूर व रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांची जोरदार फिरकी घेतली. किरीट सोमय्या विरोधात आहेत. त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही, असं पाटील म्हणाले.
भुजबळसाहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमवीरसिंग देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या आरोपावर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा, असा सवालही त्यांनी केला. लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्याचे काम होते आहे. सरकार चांगले काम करत असताना नाहक त्रास दिला जात आहे. हे लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत छगन भुजबळसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले आहे. भुजबळसाहेबांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग यशस्वी झाला तो भुजबळसाहेबांच्या पाठपुराव्याने. भुजबळसाहेबांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.
भुजबळसाहेबांसारखे नेतृत्व जपण्याचे काम आपण केले आहे. आपले फक्त 54 आमदार आहेत हे लक्षात घ्या. त्यामुळे यापेक्षा जास्त निवडून आणण्यासाठी केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे. भुजबळसाहेब अफाट काम करत आहे. त्यांच्या विभागाची शिवभोजन थाळी योजना देशभर गाजत आहे. हे काम आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायला हवं. हे कधी शक्य होईल जेव्हा आपले संघटन मजबूत असेल, असेही त्यांनी सांगितलं.
बुथ कमिट्या तयार करा. 2024 मध्ये या दोन्ही मतदारसंघात चित्र वेगळे पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वात जास्त जनाधार लाभलेले नेतृत्व राष्ट्रवादीत असून शरद पवारसाहेबांच्या रुपाने सर्वात अनुभवी नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन लाभत आहे, असेही ते म्हणाले. माझ्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही असे सांगतानाच जिद्दीने लढा, अडचण आली तर मला फोन करा, फोन नाही उचलला तर मेसेज करा, उत्तर नक्कीच मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून जरा जास्तच पाऊस पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहतेय. मात्र इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 01 October 2021 https://t.co/S8a9UYbeT5 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2021
संबंधित बातम्या:
‘मंत्री टीव्हीवर घोषणा करतात, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खडकू मिळत नाही’, फडणवीसांचा घणाघात
लसीकरणाचा मेगाप्लॅन, पुण्यासह ग्रामीण भागात सलग 75 तास लसीकरण मोहीम, अजित पवारांची माहिती
किरीट सोमय्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची गरज नाही- जयंत पाटील; देवेंद्र फडणवीसांनाही टोला
(jayant patil taunt devendra fadnavis over mi punha yeil slogan)