गावकऱ्यांनी वारंवार धरण गळतीची माहिती देऊनही पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष, कोल्हापूरात अनेक संसार उघड्यावर
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातला मेघोली लघु प्रकल्प 1 सप्टेंबरला रात्री फुटला. प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय, तर मेघोली परिसरातील शेकडो हेक्टर शेती जमीनदोस्त झालीय. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार गळतीची सूचना देऊनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानं या भागातील अनेक संसार आता उघड्यावर पडलेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातला मेघोली लघु प्रकल्प 1 सप्टेंबरला रात्री फुटला. प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय, तर मेघोली परिसरातील शेकडो हेक्टर शेती जमीनदोस्त झालीय. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार गळतीची सूचना देऊनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानं या भागातील अनेक संसार आता उघड्यावर पडलेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मेघोली, वेंगरूळ बरोबरच आजूबाजूच्या गावातील शेत जमिनी, पूल, रस्ते विजेचे खांब हे असे उध्वस्थ झालेत. तेही अवघ्या काही तासात आणि याला कारणीभूत ठरलाय मेघोलीचा लघु पाटबंधारे तलाव. या प्रकल्पाने या भागातील शेती जगवली तोच प्रकल्प आज संकट बनून या भागातील लोकांसमोर आलाय.
4 वर्षांपासून तलावाच्या जॅकवेलसह विरुद्ध बाजूलाही गळती सुरू
मेघोली, नावली, वेंगरूळ परिसरातील शेतीसाठी 1996 साली या प्रकल्पाचं बांधकाम सुरू झालं. पहिल्या टप्प्यात 4 कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी 2000 सालापर्यंत तब्बल 8 कोटी रुपये खर्च झाले. 98 दशलक्ष घनमीटर साठवणूक क्षमता असलेला हा प्रकल्प गेली अनेक वर्ष या भागातील नागरिकांची आणि त्यांच्या शेतीची तहान भागवत होता. गेल्या 4 वर्षांपासून तलावाच्या जॅकवेलसह त्याच्या विरुद्ध बाजूलाही गळती सुरू झाली. याची कल्पना स्थानिकांनी प्रशासनाला दिली होती. मात्र. त्याची दखलच घेतली नसल्याचा आरोप आता स्थानिक नागरिक करताहेत.
गेल्या 2 ते 3 महिन्यापासून देखरेखीसाठी साधा वॉचमनही नाही
इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणूक क्षमता असणारा हा प्रकल्प असताना गेल्या 2 ते 3 महिन्यापासून या ठिकाणी साधा वॉचमन देखील देखरेखीसाठी नव्हता. त्यामुळे वाढलेल्या गळतीची माहिती कोणालाही मिळाली नाही. त्यामुळेच 1 सप्टेंबरच्या रात्री साडेदहाच्या सुमारास या प्रकल्पाची भिंत तुटली आणि पाण्याचा मोठा बाहेर पडला. या दुर्घटनेत जिजाबाई मोहिते या 55 वर्षे महिलेला आपला जीव गमवावा लागलाय, तर 7 ते 8 जनावरं वाहून गेल्याच्या घटना घडल्यात.
दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग, दोषींवर कारवाईचं आश्वासन
हीच घटना सकाळच्या वेळेत घडली असती तर रानावनात कामासाठी जाणाऱ्या लोकांचं काय झालं असतं या विचारानं या भागातील लोक आता घाबरून गेलेत. दुसऱ्या बाजूला आता दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग आलीय. लवकरच घटनेची जबाबदारी निश्चित करून कारवाई करु, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच नुकसानभरपाईसाठी स्थानिक आमदार देखील पुढे सरसावलेत.
संबंधित व्हिडीओ पाहा :
हेही वाचा :
कोल्हापुरातील मेघोली प्रकल्पाचा बंधारा फुटला, महिलेचा मृत्यू, शेकडो एकर शेतजमीन वाहून गेली
Kolhapur | कोल्हापूरच्या भुदरगडमध्ये लघु बंधारा फुटला, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान
राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा सुरू, हजारो लोक एकवटले; 5 सप्टेंबरला जलसमाधी घेणार!
Know the reasons behind Megholi Dam burst in Kolhapur