धनंजय महाडिक यांच्या मुलानं निवडला राजकारणापेक्षा वेगळा मार्ग; मिळवली प्रचंड लोकप्रियता
Dhananjay Mahadik Son Krish Mahadik is Youtuber : धनंजय महाडिक यांचा मुलगा काय करतो? राजकारणाच्या पलिकडं जात त्याने एक वेगळा मार्ग निवडला आहे. त्याचं हे काम लोकांना प्रचंड आवडतं. त्याने प्रचंड लोकप्रियता देखील मिळवली आहे. तो नेमकं काय करतो? जाणून घ्या...
आधीपासून जी वाट रूळलेली आहे, त्या वाटेवर चालताना आपण अनेकांना पाहतो. राजकीय नेत्यांची मुलं राजकारणात येतात, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. पण काही राजकीय नेत्यांची मुलं राजकारणाच्या पलिकडचा मार्ग स्विकारतात आणि त्यात ते यशस्वी देखील होतात. असंच एक नाव म्हणजे कृष्णराज महाडिक… धनंजय महाडिक यांचा मुलगा… त्याने राजकारणापलीकडचा मार्ग स्विकारला आहे. त्यात त्याने चांगलं नाव कमावलं आहे. लोकप्रियता मिळवली आहे. धनंजय महाडिकांचा मुलगा नेमकं काय करतो? जाणून घेऊयात…
धनंजय भीमराव महाडिक… कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं नाव… पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक ही त्यांची तीन मुलं… यातील कृष्णराज महाडिक याने राजकारणाच्या पलिकडे जात वेगळा मार्ग निवडला आहे.
कृष्णराज महाडिक हा यूट्यूबर आहे. ‘Krish Mahadik’ या नावाने त्याचं यूट्यूब चॅनेल आहे. 307 व्हीडिओ कृष्णराज महाडिकने चॅनेलवर अपलोड केले आहेत. तर साडेचार लाख या चॅनेलचे सबस्क्रायबर्स आहेत. कृष्णच्या काही व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. कृष्णराज त्याच्या घरातील मंडळींसोबत व्लॉग करतो. त्याचे आई-वडील, भाऊ, वहिनी, छोटा अमरेंद्रसोबत कृष्ण व्हीडिओ बनवतो. त्याचे हे व्लॉग बघायला लोकांना आवडतं. कृष्णराजने मोठा भाऊ पृथ्वीराज याच्या लग्नातील एक व्हीडिओ शेअर केला होता. त्याचा हा व्हीडिओ लोकप्रिय ठरला होता.
कृष्णराज महाडिक याचे व्लॉग लोकांना आवडण्यामागे खास कारणं देखील आहेत. धनंजय महाडिक यांचा मुलगा ही कृष्णराज याची ओळख तर आहेच पण त्याचा स्वत:चा वेगळा चाहता वर्ग आहे. कृष्णराज कोल्हापुरी बोलीत त्याचे व्हीडिओ बनवतो. शुद्ध मराठी बोलण्याचा अट्टहास तो करत नाही. त्यामुळे सहज आणि साध्या बोलतील कृष्णराजचे व्हीडिओ नेटकरी आवडीने बघतात.
वर्षभरापूर्वी धनंजय महाडिक जेव्हा राज्यसभेचे खासदार झाले. संसदेचे सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली तो व्हीडिओ कृष्णराजने शेअर केला होता. त्याचा हा व्हीडिओदेखील प्रचंड चर्चेत होता. त्याच्या या व्हीडिओवर लोकांनी खूप कमेंट केल्या होत्या. संसदेतलं कामकाज अन् संसद परिसर तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळतोय, नाही तर हे सगळं आम्ही कधी बघितलं असतं?, अशी एक कमेंट देखील या व्हीडिओवर होती.