या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात, आमदार पाटील विरुद्ध महाडीक गटाचा सामना होणार
या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे. निवडणूक एका कारखान्याचे असली तरी त्याचे परिणाम मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहेत.
कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि आमदार सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडीक हा वाद कोल्हापूरसाठी नवा नाही. मात्र कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी 23 एप्रिलला मतदान तर 27 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे. निवडणूक एका कारखान्याचे असली तरी त्याचे परिणाम मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या राजकीय पटलाचे लक्ष या निवडणुकीकडे लागलंय.
साखर कारखान्यावर महाडीक यांचे वर्चस्व
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर गेली सत्तावीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडीक यांचे एखादी वर्चस्व आहे. यावेळी त्या सत्तेला सुरुंग लावण्याचा चंग सतेज पाटील यांनी बांधला. त्यासाठी आमचं ठरलंय. आता कंडका पाडायचा अशी टॅगलाईन घेऊन पाटील मैदानात उतरलेत.
एक हजार सभासद बेकायदेशीर असल्याचा आरोप
साडेसात तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यातील सभासद संख्येवरूनच या दोन्ही गटांनी निवडणुकीआधी न्यायालयात धाव घेतली होती. सत्ताधारी महाडिक गटाने एक हजारहून अधिक सभासद बेकायदेशीरपणे केल्याचा आरोप करत पाटील गटाने या सभासदांवर आक्षेप घेतला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सभासद अधिकृत ठरवलंय. त्यामुळे स्थानिक सभासद विरुद्ध बाहेरचे सभासद अशी निवडणूक असल्याचं सतेज पाटील सांगताहेत.
त्यांच्या या आरोपाला माजी आमदार अमल महाडिक यांनी चोख प्रतिउत्तर दिलंय. माझ्या वडिलांच्या गाडीचे दार उघडणाऱ्या बंटी पाटलांना घाबरायची मला गरज नाही. अशा शब्दात माजी आमदार अमल महाडीक यांनी सतेज पाटलांचा समाचार घेतलाय.
निवडणूक पक्षीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न
सत्तेचा वापर करून भाजप या निवडणुकीत हस्तक्षेप करत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा गंभीर आरोप सतेज पाटलांनी केलाय. यालाही अमल महाडिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. ही निवडणूक पक्षीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न बंटी पाटलांकडून होत आहे. त्यासाठी गोकुळ जिल्हा बँक अशा सत्तांचा वापर देखील ते करत असल्याचा आरोप महाडीक यांनी केलाय.
राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच या निवडणुकीबाबत जिल्ह्याला उत्सुकता लागून राहिली आहे. आता पाटील आणि महाडीक गटात दुरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही उत्सुकता आणखीनच वाढली आहे. वैयक्तिक आरोप प्रत्यारोप प्रत्यारोपाने गाजत असणारी प्रचार काळात ही तितकीच चुरशीची होणार आहे.