कोल्हापुरात ऊस दराबाबतची बैठक निष्फळ, राजू शेट्टींचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी आणि ऊस कारखानदार यांच्यात आज तिसरी बैठक पार पडली. या बैठकीत ऊस दराबाबत चर्चा झाली. पण ही तिसरी बैठक देखील निष्फळ ठरली आहे. त्यामुळे कोल्हापुरात या मुद्द्यावरुन वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. राजू शेट्टी यांनी तर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर | 16 नोव्हेंबर 2023 : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना, साखर कारखानदार यांची तिसरी बैठक देखील निष्फळ ठरली आहे. मागील हंगामातील 400 रुपये देता येईल का नाही यासाठी कमिटी स्थापन करण्याचा प्रस्तावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडला. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामधील संघर्ष अधिक उफाळण्याची चिन्हं आहेत. परिणामी, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर हंगाम पुन्हा लांबणीवर पडणार आहे. मागच्या गळीत हंगामातील हिशोब पूर्ण झाल्याशिवाय ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “मागील हंगामातील 400 रुपये आणि यावर्षीसाठी 3500 दराची मागणी करत आहेत. राज्यात कुठेही असा नियम नाही. सर्व कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर दिले आहेत. राज्यात आणि देशात कायदा नसताना स्वाभिमानी आंदोलन करत आहे. कर्नाटकातील कारखान्याच्या ऊस तोडीला अडवणूक केली जात नाही. मात्र जिल्ह्यातील कारखान्यांना अडवले जाते हा अन्याय आहे”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
आम्हाला शिक्षा का? मुश्रीफांचा सवाल
“यावर्षीसाठी 3100 च्या वर एफआरपी द्यायला सांगितले आहे. आम्ही कारखानदारांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही. मागील हंगामातील दर देता येईल की नाही यासाठी कमिटी नेमली आहे. ही कमिटी 21 नोव्हेंबरपर्यंत निर्णय देईल. त्यानंतर कारखान्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्जपुरवठा होईल. आता पाच दिवसांची मुदत राजू शेट्टींना दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे सगळे कायदे कारखानदार पाळत आहेत. साखर कारखानदारांनी बेकायदेशीर कृत्य केलेले नसताना आम्हाला शिक्षा का?”, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला.
’19 तारखेला रविवारी चक्काजाम होणारच’
राजू शेट्टी यांनीदेखील बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “आम्ही पोलिसांना विनंती केली आहे की, त्यांनी मध्ये येऊ नये. आम्ही ऊसाची वाहतूक करणार नाहीत. जोपर्यंत मागचा निर्णय होत नाही तोपर्यंत पहिली उचल किती घ्यायची याला आम्ही मान्यता देणार नाहीत”, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली. “19 तारखेला रविवारी चक्काजाम आंदोलन होणारच. कारण अजून आमचा प्रश्न सुटलेला नाही”, असंही राजू शेट्टी म्हणाले.