Chandrapur Landslide : घुग्गुसमधील भूस्खलनात घर गडप, आता भूस्खलनाचा धोका असलेली 160 कुटुंब स्थलांतरित, वेकोलीला प्रशासनाचे निर्देश काय?
वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
चंद्रपूर : घुग्घुस येथील आमराई वॉर्डात भूस्खलन झाले. एक घरं ७० फूट खोल जमिनीत गहाळ झाले. त्यामुळं परिसरातील नागरिकांना याचा धोका निर्माण झाला. कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव 400 बाय 150 मीटर परिसरातील 160 घरे खाली केले. या कुटुंबांना स्थलांतरित (Migrant) करण्यात आले आहे. स्थलांतरित केलेल्या कुटुंबांचे घरभाडे व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी विकोली (Vekoli) प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (Ajay Gulhane) यांनी दिले आहेत.
नगर परिषदेच्या शाळेत स्थलांतर
26 ऑगस्ट 2022 रोजी घुग्घुस शहरातील आमराई वॉर्डातील रहिवासी गजानन मडावी यांचे घर अचानक भुस्खलनामुळे 60 ते 70 फूट जमिनीखाली गेले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती प्राप्त होताच जिल्हा प्रशासन, नगर पालिका प्रशासन, वेकोली प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली. 50 मीटर परिसरातील घरे खाली करून सर्व कुटुंबांना नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्थलांतरित केले.
भूस्खलनाचे शास्त्रीय कारण समजून घेणार
या घटनेचे शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केंद्र शासनाच्या संबंधित विभागांशी संपर्क केला. खाण सुरक्षा निर्देशालयाचे संचालक सागेश कुमार, वेकोलीच्या तांत्रिक विभागाचे गुप्ता, भूविज्ञान व खनिकर्म विभागाचे उपसंचालक सुरेश नैताम, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मंगेश चौधरी, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य विभाग नागपूरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूपेश उरकुडे, आशिष बारसाकडे यांच्याशी संपर्क केला. त्यांच्यामार्फत या जागेचे शास्त्रीय सर्वेक्षण व त्याची कारणमीमांसा आदी बाबी तपशीलवार तपासून घेण्यात येत आहे.
एक हेक्टर क्षेत्र धोकादायक
आमराई वॉर्डातील घटनास्थळापासूनचे एक हेक्टर क्षेत्र धोकादायक घोषित करण्यात आली आहे. सर्व घरे खाली करून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. सदर कुटुंबाच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था वेकोलीच्या प्रशासनाने करावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत. तसेच वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.
परिसरातील 160 घरे खाली
खाण सुरक्षा निर्देशालय, भारत सरकार यांच्या सुचनेनुसार घटनास्थळापासूनच्या 400 बाय 150 मीटर परिसरातील 160 घरे खाली करण्यात आली. या जागेवर वावर करण्यास स्थानिकांना मनाई करण्यात आली आहे. तसेच स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना पुढील सुविधा होईपर्यंत भाडे तत्वावर घर घेऊन राहायचे आहे. त्यांच्या मासिक भाड्याची रक्कम व प्राथमिक गरजांकरिता आवश्यक निधी वेकोली प्रशासनाकडून देण्यात येईल.