महिलेची छेडछाड करणाऱ्याचं करायचं काय?, गावकऱ्यांनी केलं हे धक्कादायक कृत्य
याला गावात पाईपलाईनचे काम करण्यासाठी पाठवले की, बायांसोबत भानगडी करण्यासाठी पाठवले, असा सवाल गावकऱ्यांनी विचारला.
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यात बेलगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामावर काही मजूर आणि जेसीबी चालक आहे. यापैकी जेसीबी चालकाने एका महिलेची छेडछाड केली. तिने ही बाब घरी सांगितली. त्यामुळे गाातील लोकं भयंकर चिडले. त्यांनी जेसीबी चालकाला आडव्या हाताने घेतले. त्याला गावात सर्वांसमोर ट्रॅक्टरच्या समोर बांधले. त्यानंतर कंत्राटदाराला फोन लावला. याला गावात पाईपलाईनचे काम करण्यासाठी पाठवले की, बायांसोबत भानगडी करण्यासाठी पाठवले, असा सवाल गावकऱ्यांनी विचारला. त्यामुळे कंत्राटदारही चांगलाच घाबरला.
व्हिडीओत नेमकं काय?
महिलेची छेडछाड करणाऱ्याला गावकऱ्यांनी एका ट्रॅक्टरसमोर बांधले. त्यानंतर त्याला ठेकेदाराला फोन करायला लावला. ठेकेदाराशी बोलण सुरू असताना काही जणांनी जेसीबी चालकाला चांगलेच धुतले. कुणी गालावर तर कुणी पायावर मारहाण करत होते. या मारहाणीत जेसीबी चालकाचे कपडे फाटले. तो विनवणी करत होता. पण, गावकऱ्यांचा रोष काही कमी होत नव्हता.
याला करण्यात आली मारहाण
महिलेची छेडछाड केली म्हणून जेसीबी ऑपरेटरला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव राहुल जगदाडे (वय २५) आहे. तो बीड जिल्ह्यातील मूळचा रहिवासी आहे. बेलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम करणाऱ्या एका ठेकेदाराकडे राहुल कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी गावातील एका महिलेची छेडछाड केल्याचा आरोप करत त्याच्यावर आहे.
दोघांचाही पोलिसांत तक्रार देण्यास नकार
अवसरे परिवारातील काही सदस्यांनी त्याला अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर परिसरात खळबळ उडाली. मात्र पीडित आणि छेडछाडीचा आरोप करणारी महिला या दोघांनी पण पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांच्या पुढे पेचप्रसंग उद्भवला आहे.
यापुढे महिलांची छेडछाड करणारा दहावेळी विचार करेल, अशी शिक्षा या तरुणाला गावकऱ्यांनी दिली. त्यामुळे तो प्रचंड घाबरला होता. पण, दोन्ही गटांकडून कुणीही अधिकृत पोलिसांत याची तक्रार केली नाही. त्यामुळे कुणावरही काही कारवाई होणार नाही, असे दिसते.