पूरग्रस्त चिपळूणसाठी तब्बल अडीच हजार पुस्तकांची भेट, राज्याच्या मराठी भाषा विभागाचे दानयज्ञ
चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले. पुरामध्ये वाचन मंदिरातील हजारो पुस्तके खराब झाली. त्यामुळे वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली आहे.

मुंबई : चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे वाचनालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली आहे. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले. (Marathi Language Department of Government of Maharashtra has donated two and half thousand books to flood affected chiplun library)
ग्रंथसंपदेची ठाकरेंनी घेतली माहिती
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या सचिव श्रीमती मिनाक्षी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा विभागाशी निगडित सर्व संस्थांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच चिपळूणला भेट देण्यात येणाऱ्या ग्रंथसंपदेची माहिती घेतली.
वर्षानुवर्षे जोपासलेली अमुल्य ग्रंथसंपदा भिजली
अतिवृष्टीमध्ये चिपळूण शहरात महापुराचे पाणी शिरल्याने सन 1864 साली स्थापन झालेल्या व 157 वर्षांची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे मोठे नुकसान झाले. या पुरामध्ये वाचनालयात वर्षानुवर्षे जोपासलेली अमुल्य अशी ग्रंथसंपदा भिजली. वाचनालयातील पुस्तकांचे झालेले नुकसान विचारात घेऊन वाचनसंस्कृती पूर्वपदावर यावी यासाठी मराठी भाषा विभागाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. मराठी भाषा विभागातर्फे चिपळूणला तब्बल अडीच हजार पुस्तके भेट म्हणून देण्यात येत असल्याची माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
मौलिक अशा अडीच हजार पुस्तकांची भेट
अनेक वर्षाची समृद्ध वाचन परंपरा असलेल्या या वाचनालयाला मदत व्हावी. वाचकांना पुन्हा पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत आणि वाचनसंस्कृती अखंडीतपणे प्रवाहीत राहावी, या हेतूने वाचनालयाला मदत करण्यात आली आहे. राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांच्या पुढाकारातून मराठी भाषा विभागाकडून वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक अशी अडीच हजार पुस्तके भेट देण्यात आली आहेत. या अनोख्या भेटीमुळे पुरामध्ये होरपळलेल्या चिपळूणकरांना पुन्हा एकदा पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
इतर बातम्या :
भाजप फार महान पक्ष, परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतो; राऊतांनी उडवली खिल्ली
भाजपच्या पोकळ धमक्यांना राज्यातील कुठलाही नेता घाबरत नाही; नवाब मलिकांनी सुनावले
(Marathi Language Department of Government of Maharashtra has donated two and half thousand books to flood affected chiplun library)