Ahmednagar Crime : गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरण, अखेर ‘त्या’ डॉक्टरवर निलंबनाची कारवाई
वेळेवर उपचार न मिळाल्याने गरोदर महिलेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना नगरमध्ये घडली. याप्रकरणी तिघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अहमदनगर / 10 ऑगस्ट 2023 : कोपरगाव तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना 3 ऑगस्टला घडली होती. सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करत, या महिलेच्या मृत्यूप्रकरणी चासनळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल खोत यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि कंत्राटी रुग्णवाहिका चालक यांच्यावर सुद्धा सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
चासनळी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नव्हते
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील रेणुका गांगर्डे या महिलेला 3 ऑगस्ट रोजी पहाटे सहाच्या दरम्यान प्रसुती कळा सुरु झाल्या. नातेवाईकांनी महिलेला प्रसुतीसाठी कोपरगाव तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यावेळी तेथे कोणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. तेथे जाण्यासाठी रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका मिळाली नसल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती.
प्रसुतीसाठी अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू
यानंतर नातेवाईकांनी तिला धामोरी उपकेंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी प्रसूतीही झाली मात्र अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हा सगळा प्रकार उशिरा उघड झाला आणि त्यानंतर समाजसेवी संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत आरोग्य अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काल रात्री वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर रुग्णवाहिका कंत्राटी चालक आणि कंत्राटी डॉक्टर साक्षी सेठी यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.