Karnataka Election : अनपड व्यवस्था देश विकू शकते, नाना पटोले यांचा घणाघात, कर्नाटक ही तर सुरुवात आहे
मणीपूरमध्ये भाजपला बहुमत दिलं. आता दोन धर्मात भांडण करून मणीपूर पेटत आहे. असं असताना देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री कर्नाटकात प्रचारात होते.
जालना : कर्नाटक निवडणुकीचा निकाल लागला. काँग्रेसला विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांनी साडेतीन हजार किलोमीटर चालून दाखवलं. लोकांना गळ्याला लावलं. लोकांचे दुःख समजून घेतले. लोकसभेत त्यांनी आपले विचार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात त्यांचे सदस्यत्व रद्द झालं. कर्नाटकचा निकाल हा त्याचा परिणाम आहे, असं मी म्हणणार नाही. हजारो कोटी रुपये खर्च करून भाजपने काँग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचं पाप केलं होतं. त्याला परीक्षेला पुढं जावं लागलं. जनतेने ते आता मान्य केलं. राहुल गांधी हेच या देशाचे खरे नेतृत्व करू शकतात.
देशाच्या सत्तेमध्ये अनपड व्यवस्था बसलेली आहे. ते देश विकून देश चालवू शकतात. देशाला पुढं नेऊ शकत नाही. हे आता लोकांना कळलेलं आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचे कामाला कर्नाटकमधून सुरुवात झाली आहे, असंही नाना पटोले यांनी म्हंटलं.
कुणालाही धमकावणे हे धर्माला अपेक्षित नाही
धर्म हा कुणाचा द्वेष करण्यासाठी नसतो. कोणत्याही धर्म हा सगळ्यांना जोडतो. त्यांना मुख्य प्रवाहात आणतो. पण, धर्माचे नाव घेऊन काही जण लोकांना धमकवतात. अशा लोकांवर कारवाई व्हावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. कुणालाही धमकावणं हे कुठल्याही धर्माला अपेक्षित नाही.
बजरंग बली आता काँग्रेससोबत
वारकरी ही साधीभोळी लोकं आहेत. हजारो वर्षांची परंपरा त्यांनी जोपासली आहे. कारण त्यांना शांती पाहिजे. न्यायापासून मुक्त राहिलो पाहिजे. सगळ्या जाती-धर्माची लोकं एकत्रित राहिली पाहिजेत. असं सामान्य लोकांना वाटतं. काँग्रेसची भूमिका ही अशा सामान्य लोकांबरोबर आहे. पण, काही लोकं विध्वंश निर्माण करतात. त्यांच्या पाठीशी बजरंग बली नसतो. भगवान श्री राम आणि बजरंग बली आता काँग्रेससोबत आहेत, असंही नाना पटोले म्हणाले.
देशात परिवर्तनाची लाट
देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. मणीपूरमध्ये भाजपला बहुमत दिलं. आता दोन धर्मात भांडण करून मणीपूर पेटत आहे. असं असताना देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री कर्नाटकात प्रचारात होते. केंद्राचे सरकार चूप बसले आहे. डबल इंजीनचे सरकार म्हणायचे आणि लोकांना ट्रबल निर्माण करायचा. ही भाजपची भावना आहे. हे जनतेला कळलं आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय लोकं घेतली, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.