सिंधुदुर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात विस्तवही जात नाही. संधी मिळेल तेव्हा राणे उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. मात्र, आज तब्बल 12 वर्षानंतर एका मंचावर आल्यावर राणेंनी चक्क उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी देवदेवतांना गाऱ्हाणं घातलं. उद्धव ठाकरेंच्या मागची ईडापिडा दूर करण्याचं साकडंही त्यांनी घातलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज चिपी विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. तब्बल 12 वर्षानंतर राणे आणि ठाकरे एका मंचावर आले. त्या आधी कालच राणेंनी चिपीचं श्रेय आपलं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राणे आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावेळी राणेंनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी विमानतळाचं श्रेय आपलंच असल्याचंही सांगितलं. तसेच राणेंनी चक्क मुख्यमंत्र्यांसाठी गाऱ्हाणंही घातलं. मुख्यमंत्री सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू करायला आले. मी इथल्या देव देवतांना गाऱ्हाणे घालेन, या सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य दे. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. ईडापिडा असतील तर दूर कर. अशी मी प्रार्थना करतो, असं राणे म्हणाले.
यावेळी राणेंनी चिपी विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसराचं सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली. इथला निसर्ग तुम्ही पाहिला. विमानतळाच्या आजूबाजुला ब्युटिफिकेशन गरजेचं आहे. अजित पवारजी थोडे पैसे द्या. परिसरात विकास करा. निसर्ग चांगला दिसला पाहिजे, असं ते म्हणाले.
1990 साली बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. तुझी सिंधुदुर्गाला गरज आहे म्हणाले. मी आलो आणि निवडून आलो. त्यापूर्वी मी कणकवलीच्या चारपाच गावांपर्यंत मर्यादित होतो. मी या जिल्ह्यात फिरलो. तिथे प्यायला पाणी नव्हते, रस्ते नव्हते. गावाचे रस्ते सोडा, हायवेही बरोबर नव्हते. शाळा असले तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही ही अवस्था होती. अनेक गावात वीजही नव्हती. इथली मुलं शिकली. मुंबई-पुण्यात नोकरीला यायचे. मुंबईच्या मनी ऑर्डरवर अवलंबून असलेला हा जिल्हा होता. मी या जिल्ह्याचा विकास केला. मी सांगतो. पण हे लोकच ठरवतील. अडीअडचणीला मी धाऊन गेलो. उद्धवजी, मी बाळासाहेबांच्या प्रेरणेने हे काम केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांना टोला लगावला. विनायक राऊत पेढे द्यायला आले. मी अर्धा पेढा घेतला. मी त्यांना म्हणालो पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. तो गुणधर्म आत्मसात करा. बोलायचं तेव्हा हसत बोला. विचारातून माणसांची मतं जिंकता येतात हे मी सांगायला नको. असो, सर्व मंत्री आलेत. सिंधुदुर्गात वाहतूक-विमान सुरु करायला. त्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. विमानतळाच्या आजूबाजूला सौंदर्य मिळावं यासाठी खर्च करा, अशी विनंती अर्थमंत्री अजित पवारांना करतो. इतथल्या लोकांना चांगला रोजगार मिळेल. त्यांना उभं करण्याचं काम आम्ही सगळेच करू, असं त्यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 October 2021 https://t.co/IYnP9ZfALa #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
संबंधित बातम्या:
माझ्यासाठी आदित्य ठाकरे टॅक्स फ्री; राणेंचे आदित्य यांना चिमटे आणि सल्ला
(narayan rane welcome to cm uddhav thackeray at konkan)