ग्रामस्थ मतदारांना नितेश राणे यांची धमकी, विरोधकांचं राणे यांच्यावर टीकास्त्र
अजित पवारांनी तर शिवसेनेचा निधी कापून कृती केल्याची टीका भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी केलीय.
सिंधुदुर्ग : ग्रामपंचायतीत जर सरपंच जिंकला नाही, तर एक रुपयाचाही निधी देणार नाही, अशी धमकी नितेश राणेंनी ग्रामस्थांना दिलीय. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यावरुन राणेंवर टीकास्र डागलंय. ग्रामपंचायतीत राणेंच्या विचारांचा सरपंच न निवडल्यास एका रुपयाचाही निधी देणार नाही, अशी धमकी आमदार नितेश राणेंनी दिलीय. सिंधुदुर्गातल्या नांदगावातला हा व्हिडीओ आहे. ही धमकी समजा किंवा इतर काही. अशा शब्दांत राणे ग्रामस्थांशी बोलतायत. इतकंच नाही तर मुख्यमंत्री सुद्धा मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत. त्यामुळे मतदानावेळी हे लक्षात ठेवा, असंही नितेश राणेंनी म्हटलंय.
भाजप आमदार नितेश राणेंनी ज्या गावात निधी न देण्याची धमकी दिली. त्या नांदगावात 11 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. सत्तेसाठी एका पॅनलचे 6 नगरसेवक जिंकणं गरजेचं असतं. सध्या या ग्रामपंचायतीत 11 पैकी 10 सदस्य भाजपचे आहेत.
निधी न देण्याच्या इशाऱ्यासाठी नितेश राणेंनी देवगडमधल्या दोन गावांचा किस्साही सांगितला. देवगडमधल्या दोन गावांपैकी एका गावात विरोधकांचा सरपंच जिंकला. त्याचं पुढे काय झालं हे बोलत असताना समोर कॅमेरा असल्याचं राणेंच्या लक्षात आलं. आधी त्यांनी रेकॉर्ड करुन घे काही फरक पडत नसल्याचं म्हटलं. मात्र त्यानंतर कॅमेरा बंद करायला सांगितलं.
दरम्यान नितेश राणे फक्त बोलले. पण अजित पवारांनी तर शिवसेनेचा निधी कापून कृती केल्याची टीका भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी केलीय. पण निधीत असमतोलाच्या मुद्दयावर जे नवीन सरकार तयार झालं. त्याच सरकारच्या स्थापनेवेळी सर्वांना निधी देण्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं. पण आता सत्ताधारी आमदारच मुख्यमंत्री मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत, असं नितेश राणे म्हणतायत.