Omicron update : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा
राज्यात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला आहे.
बीड : गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे सावट होते. कोरोनाचे संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने जगभरात धुकमाकूळ घातला आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वप्रथम देशात कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले होते. कर्नाटक पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. राज्यात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयांना भेट
जिल्हाधिकारी राधीबीनोद शर्मा आणि जिल्हा चिकित्सक डॉ. सुरेश सांबळे यांनी कोरोनाच्या या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आष्टी परिसरातील ग्रामीण रुग्णालयांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी आणि जिल्हा चिकित्सक यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आरोग्य सोईसुविधांचा आढावा घेतला. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. घराच्या बाहेर पडताना नियमीत मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा तसेच योग्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे ते यावेळी म्हणाले.
आरोग्य विभागाच्या वतीने नवी नियमावली
दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्याओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. नव्या गाईडलाइन्स अनुसार जर एखाद्या व्यक्ती रस्त्यावर विनामास्क फिरताना आढळला तर त्याला पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच जर एखादा दुकानदार विनामास्क ग्राहकांना सामान देत असेल तर त्याला दहा हजारांचा दंड करण्यात येणार आहे. मॉलमध्ये ग्राहक विनामास्क आढळल्यास मॉल मालकाकडून तब्बल पन्नास हजारारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच विदेशातून राज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांसाठी कोरोना टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. राज्यांतर्गत प्रवास करायचा असल्यास प्रवाशाकडे कोरोनाचे दोनही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा, कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Ashish Shelar: राज्यात गब्बरचे राज्य आहे काय?, नायरमधील प्रकरणावरून शेलारांचा संतप्त सवाल