राज्यपालांच्या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक, बैठक रद्द न केल्यास काळे झेंडे दाखवण्याचा इशारा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडलीय. राज्यपालांच्या परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या दौऱ्यावरुन ठाकरे सरकारनं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
प्रशांत चलींद्रवार, टीव्ही 9 मराठी परभणी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडलीय. राज्यपालांच्या परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या दौऱ्यावरुन ठाकरे सरकारनं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. राज्यपालांनी सरकारच्या नाराजीनंतरही दौरा करण्याचं निश्चित केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपालांवर मंगळवारी पत्रकार परिषद घेत टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक रद्द न केल्यास काळ्या टोप्या काळे झेंडे दाखवून राष्ट्रवादी निषेध करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी सांगितलंय.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी 6 आणि 7 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे भेट देऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. ही बैठक आता वादात सापडली असून राष्ट्रवादी काँग्रेसने या बैठकीला विरोध केलाय. राज्यपालांना अशा पद्धतीने बैठक घेण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी ही बैठक रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने काँग्रेसने केली. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी महेश वादडकर यांना देण्यात आले. या निवेदनात राज्यपालांनी बैठक रद्द न केल्यास राष्ट्रवादी कडून राज्यपाल यांच्या वर्तनाचा काळ्या टोप्या काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येणार आहे, असं किरण सोनटक्के म्हणाले.
राज्यपाल नांदेड दौऱ्यावर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी येत्या 5 ऑगस्टला नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. नांदेड विद्यापीठातील दोन नव्या वसतिगृहाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यासाठी नांदेड विद्यापीठाने जय्यत तयारी केलीय. या दोन्ही नव्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आलेयत. मात्र, राज्यपालांच्या या दौऱ्यावर अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे आता राज्यपालांचा नांदेड दौरा वादात सापडलाय.
नवाब मलिक यांचा राज्यपालांना टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला आहे. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री नाहीत तर ते राज्यपाल आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.
इतर बातम्या:
राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम राज्यपालांकडून सुरु, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
Parbhani NCP oppose Governor Bhagatsingh Koshyari review meeting in Collector Office