N. D. Patil dies: मंत्री असूनही मुलाच्या इंजीनियरिंग प्रवेशासाठी वशिला लावला नाही, स्वत:चे कपडे स्वत:च धुवायचे; एन. डी. पाटलांचे तीन किस्से?
कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते एन. डी. पाटील यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजणारा आणि नैतिक मूल्याची जपणूक करणारा एक आधारवड हरपला आहे.
कोल्हापूर: कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते एन. डी. पाटील यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजणारा आणि नैतिक मूल्याची जपणूक करणारा एक आधारवड हरपला आहे. मंत्री असूनही मुलाच्या इंजीनियरिंग प्रवेशासाठी त्यांनी वशिला लावला नाही, मंत्री असूनही ते स्वत:चे कपडे स्वत:च धुवायचे, त्यांची राहणीमान अत्यंत साधी होती आणि अखेरपर्यंत सत्याची कास त्यांनी कधीच सोडली नाही, त्यामुळे एन. डी. पाटलांबाबत विरोधी विचारांच्या नेत्यांमध्येही आदरांचं स्थान होतं.
बाप मंत्री, पण मुलगा रांगेत
एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजमाई यांनी एन. डी. पाटलांबाबत एक किस्सा सांगितला होता. त्यातून एन. डी. पाटील यांचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं होतं. एन. डी. पाटील हे सहकार मंत्री असतानाचा हा किस्सा आहे. पाटील हे सहकार मंत्री होते. त्यावेळी त्यांचा मुलगा सुहासला मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. पण त्यांना दोन गुण कमी पडले. त्यावेळी वडील सहकार मंत्री आणि मामा शरद पवार हे मुख्यमंत्री असूनही सुहास यांच्यासाठी कोणताही वशिला लावला गेला नाही. पाटील यांनीही मुलासाठी खटपट केली नाही. सुहास यांनी मेडिकल ऐवजी इंजीनियरिंगला जायचा निर्णय घेतला. त्यांनी रांगेत उभं राहून इंजीनियरिंगला प्रवेश घेतला. फॉर्ममध्ये वडिलांचा व्यवसाय काय? असं विचारलं होतं. त्यावेळी सुहास यांनी शेती असं लिहिलं. वडील मंत्री असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही. पवारांचीही ओळख सांगितली नाही, असा किस्सा सरोजमाई यांनी सांगितला होता.
मंत्री असूनही स्वत:च कपडे धुवायचे
एन. डी. पाटील हे अत्यंत स्वावलंबी नेते होते. त्यांनी सत्याची कायम कास धरली. त्यांनी नेहमीच पुढच्या पिढींसमोर आदर्श उदाहरणे ठेवली. मंत्री असतानाचा त्यांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. पाटील तेव्हा सहकार मंत्री होते. एक माणूस त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आला होता. हा माणूस बंगल्यात बराच वेळ बसला होता. पण कोणीच येत नसल्याचं पाहून त्याने कानोसा घेतला. तेव्हा त्याला कपडे धुण्याचा आवाज ऐकायला आला. त्यामुळे त्याने थोडं पुढे जाऊन वाकून पाहिलं तर चक्क एन. डी. पाटील कपडे धूत असल्याचं त्याला दिसलं. त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. पाटील यांनाही कोणी तरी आल्याची चाहूल लागली. त्या व्यक्तीकडे पाहून पाटील यांनी थोडं थांबा, मी आलोच. सुट्टी होती म्हणून कपडे धूत होतो असं या व्यक्तीला सांगितलं. मात्र, एवढ्या मोठ्या नेत्याला आणि मंत्र्याला स्वत:चे कपडे स्वत: धूत असल्याचं पाहून हा व्यक्ती मात्र अवाकच झाला होता.
अन् प्लॅटफॉर्म तिकीट नसल्याने घरी पाठवलं
संपत मोरे यांनी एन. डी. पाटलांचा सांगितलेला दुसरा किस्साही असाच आहे. एकदा पाटलांना नांदेडला जायचं होतं. संपत मोरे आणि पाटलांचे गाडी चालक परशुराम हे त्यांना सोडण्यासाठी सीएसटी रेल्वे स्थानकात आले होते. परशुराम यांनी पाटील यांची बॅग घेतली आणि स्टेशनचे पायऱ्या चढू लागले. तेव्हा पाटील यांनी पशुराम आणि मोरे यांना थांबवून तुम्ही घरी जा. मी जाईन. तुमच्याकडे प्लॅटफॉर्मचं तिकीट नाही. विदाऊट तिकीट आला तर तुम्हाला टीसी पकडेल असं सांगून त्यांना जायला सांगितलं. मोरे आणि परशुराम यांनी नको नको म्हटलं तरी पाटील यांच्या अट्टाहासामुळे या दोघांनाही स्टेशनमध्ये न येताच जावं लागलं.
संबंधित बातम्या:
N. D. Patil Death | ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन