Tauktae Cyclone | तौक्ते चक्रीवादळ पालघरच्या दिशेने, पहाटे 5 वाजता धडकणार, लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार तौक्ते हे चक्रीवादळ पालघर जिल्ह्याच्या सीमेवर पहाटे पाच वाजता (17 मे) धडक देणार आहे. (tauktae cyclone palghar district border)
पालघर : समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा (Tauktae cyclone) धोका वाढायला सुरुवात झाली आहे. हे वादळ पालघरकडे वेगाने सरकत आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार तौक्ते हे चक्रीवादळ पालघर जिल्ह्याच्या सीमेवर पहाटे पाच वाजता (17 मे) धडक देणार आहे. तशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची ताकडीची बैठक घेतली आहे. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाला योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना केलीये. (Tauktae cyclone will hit on Palghar district border early in the morning on 17 May)
चक्रीवादळ पहाटे पाच वाजता धडकणार
गोव्यात थैमान घालणाऱ्या तौक्ते चक्रीवादळानं आता गती घेतलीय. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौक्ते चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी, मुंबई, सिंधुदर्ग या जिल्ह्यांना बसला आहे. या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय. मुंबईमध्ये वरळी, सी फेस या ठिकाणी रिमझीम पाऊस पडतो आहे. त्यानंतर याच चक्रीवादळाचा फटका आता पालघर जिल्ह्यालासुद्धा बसण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याच्या समुद्रालगत असलेल्या सीमेवर हे तौक्ते चक्रीवादळ पहाटे पाच वाजता धडकणार आहे. तशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
समुद्रालगतच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याची सूचना
याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी (16 मे) रात्री साडेनऊ वाजता आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक बोलावली. तसेच या बैठकीनंतर त्यांनी पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रालगत असलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची सूचना केली. प्रशासनाने ज्या ठिकाणी आपत्कालीन राहण्याची व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी नागरिकांनी स्थलांतरित व्हावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच घरात काही पाळीव प्राणी असतील तर त्यांना घरात बांधून ठेवू नये. त्यांना मोकळे सोडावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.
खबरदारी म्हणून लसीकरण बंद
तौक्ते चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता पालघर जिल्ह्यात उद्या एका दिवसासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रे बंद असतील. तसे आदेश पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळाचा फटका
तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी तालुक्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तालुक्यातील एकूण 104 गावांमधील 800 ते 1 हजार घरांची पडझड झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात बसलाय. दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठ्यावर परिणाम झालाय.
दरम्यान, पालघर जिल्ह्यावर हे तौक्ते वादळ पहाटे पाच वाजता धडकणार असल्यामुळे बचाव पथक तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आलाय.
इतर बातम्या :
Photo : तौक्ते वादळाचं रौद्ररुप, गोव्यात दाणादाण तर गुजरातमध्ये एनडीआरएफ सज्ज
(Tauktae cyclone will hit on Palghar district border early in the morning on 17 May)