खत, बियाण्यांच्या गोदामाची तपासणी वादाच्या भोवऱ्यात, अमोल मिटकरी यांनी केलेत हे गंभीर आरोप
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती.
गणेश सोनोने, प्रतिनिधी, अकोला : अकोल्यात कृषी निविष्ठांच्या गोदामांवर कृषी विभागाने धड टाकण्याचे सत्र सुरू केले होते. मात्र, या धाडी वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात. यात काही गोडावूनसुद्धा सील करण्यात आले आहेत. कृषी विभागाची पुण्याची टीम असल्याचं सांगितलं जातंय. यात सुमारे 100 च्या जवळपास औषधी कंपन्यांवर कारवाई केल्याची माहिती हाती आली आहे. मात्र कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहायक दीपक गवळी, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आणि बोगस बियाण्यांमध्ये ज्याच्यावर गुन्हा दाखल असा भट्टड नावाचा एक इसम यांनी गेल्या काही दिवसांपासून अधिकार नसताना ही कारवाई करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकार आई-बहिणीच्या सोबतच आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं आहे, असा आरोपही मिटकरी यांनी केला.
दीपक गवळी पीए नव्हे कृषी अधिकारी
कृषी विभागाने अकोल्यामध्ये टाकलेल्या धाडीत समावेश असलेला आणि व्यावसायिकांना लाच मागणारा दीपक गवळी हा अब्दुल सत्तारांचा पीए असल्याचे पत्र समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दौऱ्यातल्या शासकीय पत्रात गवळीचा सत्तारांचे स्वीय सहायक असा उल्लेख करण्यात आला आहे. शासकीय पत्राने कृषिमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांनी हा दावा फेटाळला आहे. दीपक गवळी हा आपला पीए नाही, तर कृषी अधिकारी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
धाडीत खासगी व्यक्ती कशा?
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली होती. यात अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहाय्यक दीपक गवळी याचा देखील समावेश असल्याचे उघड झाले आहे. अशातच या पथकाने पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप अक्षद फर्टिलायझर कामोणीचे सेल्स ऑफिसर राजेश शिंदे यांनी केलाय.
खासगी लोकांच्या सांगण्यावरून गोडाऊन सील
अकोल्यात स्टोकिस्ट संजय इंगोले यांनीही या धाडी संदर्भात अकोल्यातील एमआयडीसी पोलिसात तक्रार केली आहे. कृषी विभागाच्या पथकात काही खासगी लोक होते. कारवाई झाeल्यानंतर खासगी लोकांच्या म्हणण्यावरुन गोडावून सील केल्याचा आरोप स्टोकिस्ट यांनी करत यामुळे मानसिक त्रास झाला. म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
कृषी विभाग धाडी टाकतेय याचे आदेश मीच दिल्याचा खुलासा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर खरीप हंगामासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. त्यात तक्रारींचा विषय घेण्यात आला. त्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात होणाऱ्या बोगस बियाणे, बोगस खते आणि बोगस औषधी यांच्या कंपनीवर धाडी टाकून तपासणी मोहीम सुरू केली. असा खुलासा कृषीमंत्री अब्दुल सत्तार दिला होता. मात्र, आता दीपक गवळी नावावरून हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी विभागाच्या वतीने अकोल्यातील काही कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. या धाडीमध्ये असलेल्या पथकाने पैशाची मागणी केली असल्याची तक्रार कंपन्यांकडून करण्यात आली. तसेच या धाडीमध्ये कृषी विभागाच्या अधिकाराऱ्यांव्यतिरिक्त अनेक खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप करण्यात आले होते. आता या प्रकरणात अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.