चोरटा आधुनिक मशीनने पहाटे एटीएम फोडत होता, पोलीस गस्तीवर तेवढ्यात…
नायगाव शहरातही पोलीस रात्री गस्तीवर राहत होते. अशात नायगाव पोलिसांना एटीएम फोडताना एक आरोपी दिसला.

नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत एटीएम फोडण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवली होती. नायगाव शहरातही पोलीस रात्री गस्तीवर राहत होते. अशात नायगाव पोलिसांना एटीएम फोडताना एक आरोपी दिसला. त्याच्याकडे काही साहित्य होते. त्याला अटक करण्यात आली. शिवाय त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले. नांदेडच्या नायगाव शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडताना एक चोरटा पोलिसांनी रंगेहाथ अटक केलाय. पहाटेच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या लक्षात ही घटना आल्याने लाखो रुपयांची चोरी टाळण्यात पोलिसांना यश आलंय. अनिल श्रीमंगले नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य आणि एक आधुनिक मशीन पोलिसांनी जप्त केली.
चोरीच्या घटनांत सहभागाची शक्यता
नांदेडमध्ये एटीएम फोडून त्यातील रोकड पळवण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यात या चोरट्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्या दृष्टीने नायगाव पोलीस अधिकचा तपास करत आहेत. अशी माहिती तपास अधिकारी ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.
यांनी केली कामगिरी
पोलीस गस्तीवर असताना त्यांना एका एटीएममध्ये चोरटा चोरी करताना दिसला. पोलिसांनी त्याला अटक केली. ही कामगिरी पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन गंदपवार, मुस्तापुरे, सांगवीकर, गृहरक्षक दलाचे पवळे, बरबडे, दासरवाड, साबणे, सराफा लाईनमधील वाचमेन शेख अफजल यांनी केली.
चोरट्याकडे होते हे साहित्य
आरोपीचे नाव अनिल वामनराव श्रीमंगले असे आहे. अनिलकडे पोलिसांना मोठा लोखंडी रॉड, दोन पकड, तीनपट्टी पाने, एक रिंग पाना, एक सेट इंक कंपनीची मशीन, एक ईगल कंपनीचा काटा, एक लावा कंपनीचा मोबाईल असे साहित्य सापडले. पोलिसांनी वरील साहित्य जप्त केले.
एवढे सारे साहित्य घेऊन एकट्याने एटीएम फोडणे कठीण आहे. त्याच्यासोबत काही साथीदार असावेत. ते पळून जाण्याची शक्यता आहे. कारण एकटा चोर स्वतःच्या हिमतीवर चोरी करणे अशक्य वाटते. या दिशेने पोलीस तपास करत आहेत. एका आरोपीला अटक झाली असल्याने इतरांची नावे त्याच्याकडून मिळण्याची शक्यता आहे. ही टोळी असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. कारण यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत.