ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व, मात्र साताऱ्यात तिरंदाजाला जेसीबीने घर पाडण्याची धमकी
टोकियो ऑलिंपिकमध्ये 'आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्याया प्रविण जाधवला घर बांधकामावरुन शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे.
सातारा : टोकियो ऑलिंपिकमध्ये ‘आर्चरी’ (तिरंदाजी) क्रिडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्याया प्रविण जाधवला घर बांधकामावरुन शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावे लागत आहे. 4 गुंठे जागेवरुन सुरू झालेला वाद प्रशासनापर्यंत पोहचला आहे. “प्रांताधिकाऱ्यांनी घर बांधायला जागा दिली. असं असताना त्यात समाधानाने राहता येत नसेल तर या गावात राहून तरी काय करायचे?” असा उद्विग्न सवाल या कुटुंबाने विचारलाय.
फलटणपासून साधारण 16 किलोमीटर अंतरावर असलेले सरडे हे प्रविणचे गाव. याच गावात तो वाढला, शिकला, मोठा झाला. प्रविणचे वडील आजही सरडे गावात मजुरी करतात. जागतिक ऑलंपिक स्पर्धेमधील ‘आर्चरी’ (तिरंदाजी) या क्रीडा प्रकारासाठी भारतीय संघात सरडे गावचा प्रविण जाधव याची निवड झाली होती. घरी आई-वडील, चुलती व चुलतभाऊ असे 4 जणांचे कुटुंब दोन खोल्यांमध्ये राहते.
स्वत:चे घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना 84 गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिले. त्याठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाचा विरोध आहे. या विरोधातून दोन दिवसापूर्वी दोन्ही कुटुंबात वाद झाला.
प्रविणच्या कुटुंबाने सांगितलं, “फलटणच्या प्रांताधिकाऱ्यांनी आम्हाला घर बांधणीसाठी जागा मोजून दिली आहे. शेती महामंडळाच्या 84 गुंठे शिल्लक क्षेत्रातील जागा आम्हाला मोजून देण्यात आली. असं असतानाही शेजारचे एक कुटुंब शेती महामंडळाने दिलेली जागा आमचीच आहे, असं सांगून बांधकामात अडथळा आणत आहेत.”
“शेजाऱ्यांकडून जेसीबीने घर पाडण्याची धमकी”
प्रविण जाधवच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने दोन खोल्यांचे घर जेसीबीने पाडू अशी धमकी त्यांना दिली. यामुळे प्रविणचे वडील रमेश जाधव यांनी गावातून सहकार्य होणार नसेल तर आम्ही दुसऱ्या गावात घरबांधून राहू, असं मत व्यक्त केलंय.
“तोडगा न निघाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा”
प्रविण जाधवसारख्या ऑलिंपिक खेळलेल्या खेळाडूंच्या कुटुंबावर अन्याय होत असेल आणि त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करणार असेल तर ही निंदनीय बाब आहे. याप्रश्नी तोडगा न निघाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा सरडे गावचे माजी सरपंच रामभाऊ शेंडगे यांनी दिलाय.
हेही वाचा :
‘ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 3 कोटी रुपये देणार’, मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घोषणा
PHOTOS : बस ड्रायव्हरच्या मुलीला प्रशिक्षण नाकारलं, वडिलांना रडू कोसळलं, आता हीच मुलगी भारतासाठी ऑलिंपिक इतिहास रचणार
Photos : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टोकियोत ऑलम्पिकचं आयोजन, प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्णय बाकी
व्हिडीओ पाहा :
Threatened calls to family of Tokyo Olympics Archer Pravin Jadhav