अहमदनगरमध्ये तीन वाहनांचा भीषण अपघात, देवदर्शनाहून घरी परतत होते पण…
रत्नागिरीला देवदर्शनासाठी येवल्यातील कुटुंब गेले होते. देवदर्शन करुन पिकअप वाहनाने येवल्यात घरी परतत होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
अहमदनगर / कुणाल जयकर : देवदर्शन करुन रत्नागिरीहून येवल्याला घरी परतत असणाऱ्या पिकअप वाहनाला टेम्पो आणि ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत पिकअप वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, 12 जण गंभीर जखणी झाले. आयशर टेम्पो, ट्रक आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी जवळील निंबळक बायपास रोडवर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
देवदर्शन करुन घरी परतत असतानाच काळाचा घाला
पिकअपमधील व्यक्ती रत्नागिरीहून देवदर्शन करुन येवले येथे घरी चालले होते. निंबळक बायपास रोडचे काम सुरू असल्याने एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरु आहे. मंगळवारी रात्री या रोडवरून जात असताना पिकअपला आयशर टेम्पो आणि ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आयशर टेम्पो चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर कल्याण महामार्गावर पिकअप जीप दुचाकी अपघातात पाच ठार
नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. मृतांमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे. नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे सर्व शेतमजुर चालले होते. यावेळी पिकअप जीपने दोन दुचाकीवरील आठ जणांना चिरडल्याची घटना घडली.
यात चिमुकल्यांसह एका व्यक्तीचा जागीच तर उपचारादरम्यान तीन असे पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकली, दोन पुरुष, एक महिला यांचा समावेश आहे. मृत्यू झालेले सर्व शेतमजुर असून, शेतमजुरीचे काम संपवून घरी जात असताना रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली.