प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांना मोलाचा सल्ला, ते आमदार अपात्र होण्यासाठी काय करावं लागणार?
न्यायालयाच्या निर्णयातून उद्धव ठाकरे यांना मोठं हत्यार मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. तरचं ते आमदार अपात्र होतील.
गणेश सोनोने, प्रतिनिधी, अकोला : सर्वोच्च न्यायालयाने काल महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला. यावेळी त्यांनी काही निरीक्षणं नोंदवली. या निरीक्षणांवरून आमच्या बाजूने निकाल लागल्याच्या प्रतिक्रिया दोन्ही गटांकडून व्यक्त केल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले. काल त्यांनी निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
आक्रमक भूमिका घ्यावी लागेल
न्यायालयाच्या निर्णयातून आज उद्धव ठाकरे यांना मोठं हत्यार मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. तरचं ते आमदार अपात्र होतील. असा जाहीर सल्ला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय. ते अकोल्यात पत्रकार परिषद बोलत होते. हा जाहीर सल्ला देतोय. कारण ज्यावेळी गोंधळला माणूस असतो, त्यावेळी खरी सल्ल्याची गरज असते, असेही आंबेडकर म्हणाले.
विधानभवनाला घेराव घालण्याचा सल्ला
उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षांसोबत बोलून म्हणजेच चर्चा करून त्यांना सोबत घ्यायला हवे. अन् विधान भवनाला घेराव घातला पाहिजे. येत्या एका महिन्यात हा निर्णय घ्यावा, अशी मागणी घातली पाहिजे. जर 16 आमदार अपात्र झाल्यास पुढे 24 आमदारांवर कारवाई होऊ शकते. अशी शक्यता आंबेडकर यांनी वर्तवली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडील मोठे हत्यार
सेना वर्सेस सेना हे प्रकरण सुरू होतो. कायद्याच्या दृष्टिकोणातून हा निर्णय योग्य आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. त्या म्हणजे पक्षाचा व्हीप हाच योग्य. भरत गोगावले यांनी लागू केलेला व्हीप लागू होणार नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळलं नसतं. असा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांना १२ आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार देण्यात आला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा हत्यार आहे, असं मी मानत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे सल्ल्याकडे कसे बघणार?
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली. ही युती वंचित आणि ठाकरे गट येवढ्यापुरतीच मर्यादित आहे. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना घेण्यावरून वाद आहेत. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती मानले जात आहे. यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी हा सल्ला दिला आहे. हा सल्ला उद्धव ठाकरे कशाप्रकारे घेतात, यावर सर्व अवलंबून आहे.