मुंबई : सर्व विरोधक जर का एकजिन्सीपणाने एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. कसब्याच्या निकालानेही तेच दाखवून दिलं आहे, असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधत हे विधान केलं. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या बांधावर सत्ताधाऱ्यांनी गेलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचं कौतुक करताना माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा उद्धव ठाकरे यांनी किस्सा सांगितला. त्या काळात काँग्रेस जोरात होती. स. का. पाटील मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. स.का. पाटील यांच्या सारख्या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात जॉर्ज फर्नांडिस उभे राहिले. जॉर्ज माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. जॉर्ज नवखे होते. पण त्यांनी एक घोषणा दिली. आपण जिंकू शकतो. त्यांना पाडू शकतो, अशी घोषणा जॉर्ज यांनी दिली. सर्वांना वाटलं हा नवखा मुलगा काय करणार? पण जॉर्ज जिंकले. त्याच विजयाची कसब्याने आठवण करून दिली आहे. 30 वर्षाचा भाजपचा किल्ला आपण भूईसपाट करून जिंकू शकतो हा आत्मविश्वास केवळ पुणेकरच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे. या निकालाने पुढची दिशा स्पष्ट केली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या विजयाची आपण पुनरावृत्ती करू शकतो. आपण सर्वांनी पुढील निवडणुका एकत्र येऊन लढल्या पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
मी पहिल्यांदा विधीमंडळात जाणार आहे. विषय असेल तर सभागृहात जाईल. मागच्यावेळी मी नागपूरला गेलो होतो. ज्या ज्यावेळी गरज असेल तेव्हा मी सभागृहात आणि विधीमंडळात जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या मनात स्वप्न नाही. स्वप्नात राहणार नाही. जी जबाबादीरी आहे, ती पार पडतो. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री ठरवताना काय घडलं ते मी सांगितलेलं आहे. माझ्या मनात कोणतंही स्वप्न नाही. देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम जनतेने केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजकारणातील कटुतेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यावरून त्यांनी फडणीसयांना फटकारलं. त्यांच्यासोबत जे गेले नाहीत त्यांच्यावर कारवाई होते, ते काय आहे? राजन साळवी, वैभव नाईक, अनिल परब आणि नितीन देशमुख यांच्यावर जे चाललंय ती सूड भावना नाहीये का? हा बदला नाहीये का? कुटुंबाच्या कुटुंबावर आरोपाची राळ उडवून टीका करून त्यांना उद्ध्वस्त करायचं आणि त्यातून काही साध्य होत नसल्याचं दिसलं की लाळघोटेपणा करायचा. मेघालयात तेच घडलं. आधी टीका केली. आता संगमाच्या बाजूला जाऊन बसले आहेत. जणू काही झालंच नाही अशा लाचारपद्धतीने संगमाच्या बाजूने गेले, असा हल्लाबोल त्यांनी केला. पॅचअपचा प्रस्ताव आला नाही. तुम्ही त्यांनाच विचारा. रोज उठून ठाकरेंविरोधात शिमगा करून काही होत नाहीये. लवकरच खोकेवाल्यांची होळी होणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
आमच्याकडील लोकंही तुम्ही घेतले. त्यांच्यावर गोमूत्र शिंपडले का? आमच्या लोकांवर आताही चौकशी सुरू आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी सुरू आहे का? की पक्षात घेतल्यावर त्यांना क्लिनचीट देणार आहात का? हा सत्तापिपासूपणा आहे. विरोधकांना नामोहरम करणं सुरू आहे. पक्षात या नाही तर तुरुंगात जा, असं धमकावलं जात आहे. मध्य प्रदेशातील भाजपच्या एका मंत्र्यानेही विरोधी पक्षातील नेत्यांना दम दिलाय. भाजपमध्ये या नाही तर कारवाईला सामोरे जा. कारवाईच्या बुलडोझर फिरवू असं धमकावलं जात आहे. पण आता जनतेच्या मतांचा बुलडोझर या हुकूमशाहीविरोधात फिरवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शेतकऱ्यांना तातडीने मदत झाली पाहिजे, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. घरातून कारभार केल्याचा माझ्यावर आरोप करत होतात ना. आता तुम्ही बांधाबांधावर जा. शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. त्यांना अवकाळीच्या संकटातून बाहेर काढा, अशी मागणी त्यांनी केली.