देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय वारस कोण?, भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण?; नाथाभाऊ यांचे दावे काय?
निवडणुकीत आता कितीही खोके वाटले, कितीही मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला तरीही मतदार आता सुज्ञ झाला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
जळगाव : मी जेव्हा भाजपमध्ये आमदार झालो तेव्हा गिरीश महाजन कुठेच नव्हते. साधे सरपंचही नव्हते. त्यांनी गल्लोगल्ली फिरवलं. महाजन यांनी माझ्याशिवाय त्यांची कोणतीही प्रचाराची सभा पार पाडली नाही. गिरीश महाजन आता मोठे झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती आहेत. पुढच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांचा वारस म्हणून गिरीश महाजन यांचं नाव यायला लागेल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. गिरीश महाजन मोठ्या प्रसंगांमध्ये अडकलेले होते. त्या प्रसंगांमधून त्यांना मी बाहेर काढलं. त्यांना मी बाहेर काढलं नसतं तर ते महाराष्ट्रातही दिसू शकले नसते, असंही नाथाभाऊंनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांनी सात खाती दिली होती, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. बावनकुळे यांच्या या दाव्याला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला सात खाती नव्हे तर 12 खाती मिळाली होती. तीही माझ्या कर्तृत्वाने मिळाली होती. मला 12 खाती देणं त्यांना परिस्थितीने भाग पाडलं आहे. कारण त्या कालखंडात मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो. देवेंद्र फडणवीस यांनी ही खाते दिलेली नव्हती. तर परिस्थितीनुसार पक्षाने खाते दिले होते, असं एकनाथ खडसे म्हणाले.
भाजपने सर्व काही दिलं
भारतीय जनता पार्टीने मला काहीच दिलेलं नाही असं मी कधीच बोललो नाही. भाजपाने मला चांगला सन्मान दिला. 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार होतं का? देवेंद्र फडणवीसांमुळे सरकार आता आलं का? नाही. त्यांना जागाही वाढवता आल्या नाही. पुन्हा येईल म्हणाले होते. सत्ता असताना देखील आपण कमी जागा का निवडून आणल्या?, असा सवाल त्यांनी केला.
बावनकुळेंवर सर्वाधिक अन्याय
भाजपमधल्या एक दोन जणांवर माझा रोष आहे. भाजपमध्ये बावनकुळेंवर किती अन्याय झाला हे मला माहिती आहे. एवढी मानहानी झाली तरीही ते तिथे आहेत. त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं जात नाही. मात्र, तिकीट देणार असल्याचा गाजावाजा केला. मिरवणूक घरी घेऊन जा असं सांगितलं गेलं. हे काय होतं?, असा सवालही त्यांनी केला.
फडणवीस माझ्यामुळेच अध्यक्ष
देवेंद्र फडणवीस हे मान्य करतील की त्यांना अध्यक्ष करण्यासाठी मी प्रयत्न केला होता. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव मी देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्ष पद द्यायला लावलं. केंद्रीय नेतृत्व हे जोपर्यंत सोबत नव्हतं तोपर्यंत त्यांना थांबवण्यात आलेलं होतं, असा दावाही त्यांनी केला.
ओबीसी नेत्यांना त्रास
भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी नेत्यांना त्रास दिला जातोय. भाजपसाठी ओबीसी नेत्यांनी उभं आयुष्य घालवलं. मीही त्यात होतो. एकनाथ खडसेंना किती त्रास दिला जातो हे अख्खं जग पाहतोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंकजा यांच्याशी राजकीय चर्चा नाही
यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही भाष्य केलं. पंकजा मुंडे यांच्याशी माझी कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी कौटुंबीक चर्चा झाली, असं सांगत खडसे यांनी या भेटीवरील चर्चांना पूर्णविराम दिला.