एमआयएमसोबतची युती का तुटली?, घोडं कुठं आडलं?; प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण
महाविकास आघाडीत वंचित आल्यावर किती फायदा होईल हे लोकं ठरवतील. जिंकण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात. विजय करायचा की नाही ते लोकांच्या हातात आहे.
लातूर: प्रकाश आंबेडकर यांनीच आमच्याशी युती तोडली, असं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मध्यंतरी म्हटलं होतं. त्यामुळे वंचित आणि एमआयएमची युती का तुटली याची पुन्हा चर्चा सुरू झाली होती. प्रकाश आंबेडकर यांनीही युती का तुटली यावर भाष्य केलं नव्हतं. मात्र, ओवैसी यांनी युती तुटल्याचं खापर आंबेडकरांवर फोडल्यानंतर आंबेडकर यांनी ही युती तुटण्याचं नेमकं कारण सांगितलं आहे. पहिल्यांदाच आंबेडकर याविषयावर बोलले आहेत. एमआयएममुळेच युती तुटल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता एमआयएम त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आम्ही एमआयएमशी युती करणार नाही. त्यांचा एक खासदार निवडून आल्यावर त्यांनी व्यवस्थित वाटाघाटी करायला हव्या होत्या. त्यांना विधानसभेला 100 जागा हव्या होत्या. त्यापेक्षा खाली येणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. 100 जागा देणं हे राजकीयदृष्ट्या चूक आहे हे आम्ही सांगत होतो. आम्ही सांगितलं एकत्र बसू. पण त्यांनी ऐकलं नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
ते ऐकायलाच तयार नव्हते
वंचित आणि एमआयएम युतीला यश मिळालं म्हणजे आपली फार मोठी हवा झाली असं नाही हे सुद्धा सांगितलं. 35 ते 50 या दरम्यान आपल्या जागा निवडून येऊ शकतात. सभेला कितीही गर्दी झाली तरी. आपल्या तेवढ्याच जागा निवडून येऊ शकतात हे मी त्यांना सांगत होतो. लढण्यासाठी जे द्रव्य लागत ते आपल्याकडे नाही, हे ही मी त्यांना सांगितलं.
तसेच येणाऱ्या सीट कोणत्या त्याही मी सांगायला तयार होतो. पण त्यांचा अट्टाहास 100चाच होता. तो आम्हाला परिपूर्ण करणं कठिण होतं. राजकीयदृष्ट्या योग्य नव्हतं. त्यामुळे आम्ही वेगळे झालो, असं आंबेडकर म्हणाले.
युतीचा काही संबंध नाही
विधानसभा पोटनिवडणूक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं. शिवसेनेने काही ठिकाणी उमेदवार दिले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही दिले आहेत. त्यामुळे या युतीचा काही संबंध नाही. ज्यांना कुणाला वाटतं एकमेकांना मदत करावी तर त्यांनी करावी, असं ते म्हणाले.
आम्ही आधीच टाळी दिली आहे
आमची युती फक्त शिवसेनेसोबत झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते कन्व्हिन्स करत आहेत. वंचितला सोबत घेण्याचा आग्रह धरत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यश येईल असं गृहित धरू, असं सांगतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युती करण्याची आम्ही आम्ही आधीच टाळी दिली आहे अजून काय करायला पाहिजे, असंही ते म्हणाले.
आघाडीत सामुहिक नेतृत्व
महाविकास आघाडीत शरद पवार यांचं नेतृत्व मानलं जातं. तुमचे पवारांशी चांगले संबंध नाहीत. पण तुम्ही महाविकास आघाडीत जाणार आहात. त्यामुळे तुम्ही पवारांचं नेतृत्व मानाल काय? असा सवाल त्यांना करण्यात आला.
त्यावर, कुणाचंही कोणीही नेतृत्व मानत नाही. महाविकास आघाडीत सर्व पक्ष वेगवेगळे आहेत. आघाडीत सामूहिक नेतृत्व आहे. अपेक्षा काय आहेत ते एकमेकांना सांगितलं पाहिजे. बोलणार नसाल तर अडचण आहे, असं ते म्हणाले.
लोकशाहीवाद्यांनी एकत्र यावं
महाविकास आघाडीत वंचित आल्यावर किती फायदा होईल हे लोकं ठरवतील. जिंकण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत असतात. विजय करायचा की नाही ते लोकांच्या हातात आहे. हुकूमशाही थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व लोकशाहीवाद्यांनी एकत्र आलं पाहिजे, असं ते म्हणाले.
शत्रू कोण हे पाहावं
महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बसून तुम्ही चर्चा करणार का? असा सवाल आंबेडकरांना विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकत्र बसण्याबाबत कुणी काही इच्छा व्यक्त केल्या तर काही आड येतं असं वाटत नाही. शत्रू कोण आहे हे पाहिलं पाहिजे. त्यानंतर निर्णय घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले.