आरोग्य विभागाच्या शिपायाला डॉक्टरचा सल्ला न घेता चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न, या जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ
सध्याचं प्रकरण अधिक व्हायरल झालं आहे. त्याचबरोबर जो शिपाई उपचार करीत होता, त्याचा व्हिडीओ सुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळे तिथल्या डॉक्टर आणि कर्मचारी वर्गावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पालघर : पालघर (Palghar) जिल्ह्यात आत्तापर्यंत आरोग्याशी निगडीत अनेक समस्या उघडकीस आल्या आहेत. पालघरमध्ये आरोग्य विभागाचे (Department of Health) कर्मचारी नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर (Resident Doctor) राहत असल्याच्या अनेक तक्रारी आतापर्यंत दाखल झाल्या आहेत. परंतु अद्याप एकाही कर्मचाऱ्यावरती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. नुकतीचं आणखी घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये आरोग्य विभागाचा मद्यप्राशन केलेला कर्मचारी चिमुकलीला इंजेक्शन देत असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता
पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा उघडकीस झाला आहे. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केला, ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र चिमुकलीसोबत असलेल्या कुटुंबीयांनी त्याला रोखून धारेवर धरलं. आपण मद्य प्राशन केलं असल्याची कबुली व्हिडिओमध्ये शिपायाने दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे . पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत असल्याची ओरड नेहमीच होते. मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर येत आहे.
आरोग्य केंद्रातला हा प्रकार उजेडात आल्यामुळे…
सध्याचं प्रकरण अधिक व्हायरल झालं आहे. त्याचबरोबर जो शिपाई उपचार करीत होता, त्याचा व्हिडीओ सुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळे तिथल्या डॉक्टर आणि कर्मचारी वर्गावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एका आरोग्य केंद्रातला हा प्रकार उजेडात आल्यामुळे इतर आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि डॉक्टर सुद्धा चांगलेचं हादरले आहेत.