पंकजा मुंडे यांचे पाय अचानक भगवानगडाकडे का वळले? समाजासाठी मुंडे भाऊ-बहिणीची एकजूट, मराठवाड्यात चर्चा, राजकीय अभ्यासक काय सांगतात?
राजकीय वैर विसरून अचानक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री एकत्र आले, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय.
महेंद्रकुमार मुधोळकर, बीड : ऊसतोड कामगार आणि भागवानबाबा (Bhagwan baba) भक्तांभोवती फिरणारं बीड आणि मराठवाड्यातलं (Marathwada) राजकारण. भगवान गड आणि स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं कुटुंब हे या राजकारणाचं केंद्रस्थान. दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त इथलं राजकारण प्रकर्षानं जाणवतं. वर्षातील या दोन सभांसाठी पंकजा मुंडेंचे पाय बीडकडे वळतात. एरवी स्थानिक सण-समारंभाला हजेरी लावतात. पण गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे यांचं राज्यातील सक्रियता कमी झाली आहे.
भाजपने राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी दिल्याने राज्यांतर्गत राजकारणापासून त्यांना दुरावा साधावा लागतोय. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडावर राजकीय मेळाव्यांना इथल्या महंतांनी मनाई केल्यानंतर मुंडे भाऊ-बहिणींमधला वाद आणखीच चव्हाट्यावर आला. पण आज तब्बल 7 वर्षानंतर भगवान बाबांच्या भक्तांसाठी राजकीय वैर विसरून समाजासाठी आपण एकत्र येऊ, असं वक्तव्य खुद्द धनंजय मुंडे यांनी केलंय. तर पंकजा मुंडे यांनीही भगवान गडाविषयी बोलले तर मान कापून ठेवीन, असा शब्द दिलाय.
मराठवाड्यात चर्चांना उधाण
अहमदनगर जिल्ह्यातील भगवान गडावरील नारळी सप्ताहाचं आमंत्रण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना देण्यात आलं होतं. हे आमंत्रण स्वीकारून पंकजा मुंडे या कार्यक्रमात सहभागी झाल्या. भगवान गडाचे नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यानंतर राजकीय टीका टिप्पण्यांचे धारदार बाण उडणार हे सहाजिकच आहे. ते तसे उडालेही. आम्ही एकत्र येऊ नयेत म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला. तर नामदेव शास्त्री यांनीदेखील पंकजा मुंडे यांनी गैरसमज दूर करावा, अशी विनंती केली. तर धनंजय मुंडे यांनीही आज माझी ताई काही गज जवळ आल्याचं भाष्य केलं. या सगळ्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय.
राजकीय अर्थ काय?
राजकीय विश्लेषक भागवत तावरे यांनी यामागील नेमकी पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, ‘ भगवान गड व पंकजा मुंडे यांच्यात गेली 7 वर्षे अबोला होता. पंकजा मुंडे यांनी केवळ अबोला नाही तर भगवान गडाला पर्याय देताना गोपीनाथ गड व सावरगाव घाट येथील भक्ती गड स्थापन केला. इथे दसरा मेळावा देखील घेतला गेला . तत्कालीन मंत्री महादेव जानकर यांनी महंत बदलू अशी घोषणा पंकजा मुंडे यांच्या समक्ष केलेली होती . आता जेव्हा पंकजा मुंडे 7 वर्षानंतर भगवान गडाच्या नारळी सप्ताहात पोहोचल्या तेव्हा वर्तमान परिस्थिती वेगळी पहावयास मिळाली. भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले आहे. बीडमधील अनेक भाजप आमदार थेट नागपूरच्या सदरेवर आहेत. हक्काचा मतदार म्हणून भगवान गडाच्या भक्तांकडे पंकजा यांचे राजकीय पाय वळणे ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. असं स्पष्ट मत तावरे यांनी व्यक्त केलंय.