पंकजा मुंडेंचा हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा तर भुजबळांची आंदोलनात उतरण्याची तयारी
लक्ष्मण हाके ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं लिखीत मागणी करण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरु आहे. आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी हाके यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. तर छगन भुजबळ देखील आता मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं लिखीत द्या या मागणीसाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरु आहे. त्यांना सरकारचं शिष्टमंडळही भेटलं. पण त्यांनी पाणी घेण्यास नकार दिला तर पंकजा मुंडेंनी हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून भुजबळांनी आंदोलनात उतरण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. ज्या मराठ्यांच्या ओबीसी नोंदी सापडल्यात, त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या. या मागणीसाठी जरांगेंनी महिन्याभराचा वेळ सरकारला दिला. आता ओबीसी आरक्षणाला धक्का नको, यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे 5 दिवसांपासून जालन्याच्या वडीग्रोदी गावात उपोषणाला बसलेत. हाके आणि वाघमारेंच्या भेटीला सरकारकडून मंत्री अतुल सावे, भागवत कराड आणि संदीपान भुमरे उपोषण स्थळी आले. मात्र पाणी पिण्याची विनंती, हाकेंनी अमान्य केली.
हाकेंच्या प्रमुख 2 मागण्या कोणत्या
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देवून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे लिहून द्यावं आणि बोगस कुणबी नोंदीला सरकारचं संरक्षण असल्याचा आरोप हाकेंचा आहे. 80 % मराठे ओबीसी झालेत, या जरांगेंच्या वक्तव्यांवर सरकारचं काय म्हणणंय, त्यावरही सरकारकडून हाकेंचा स्पष्टीकरण हवं.
लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी राज्यसभेचे भाजपचे खासदार भागवत कराडही आले. कराड डॉक्टर असल्यानं त्यांनी हाकेंचा बीपीही चेक केला. ज्यात बीपी वाढल्याचं कराड यांनी सांगितलं. मंगळवारी, हाकेंचं 5 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. या भेटीत ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही, हे सरकारनं लिखीत द्यावं, असं हाकेंचं म्हणणंय.
लक्ष्मण हाके याचे 5 दिवसांपासून उपोषण
हाके 5 दिवसांपासून उपोषण करत आहेत..आणि रविवारपासून पाणीही सोडल्यानं त्यांची प्रकृती बिघडत चाललीय..त्यामुळं सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला पोहोचण्याच्या काही मिनिटांआधी पंकजा मुंडेंनी ट्विट करत,जरांगेंप्रमाणंच हाकेंच्याही उपोषणाकडे लक्ष देण्याची विनंती सरकारला केली.
प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.
पंकजा मुंडे आणि भुजबळ दोघेही ओबीसी नेते आहेत. भुजबळ उघडपणे आधीपासून जरांगेंच्या मागणीला विरोध करत आहेत..आता, आंदोलनात उतरण्याचीही तयारी भुजबळांनी दर्शवलीय.