अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का? चंद्रकांत पाटलांवर पेडणेकर भडकल्या, रश्मी ठाकरेंवरच्या प्रश्नाला उत्तर
भाजपचे नेते असंच बोलणार असतील तर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
मुंबईः रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आहेत. अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का, असा सवाल करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. चंद्रकांत दादा हे भाजपचे एक मोठे नेते आहेत. मात्र, त्यांची किव येते. त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले.
काय आहे प्रकरण?
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज एकदम शांत पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढत जोरदार टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. मात्र, त्यांचा बहुदा मुलावरही विश्वास नसेल. त्यामुळेच ते त्यांच्याकडे चार्ज देत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.
पंतप्रधांनाची भेट घेऊ…
चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, चंद्रकांत दादांची किव येते. ते मोठे नेते आहेत. त्यांच्याबाबत मी बोलणे योग्य होणार नाही. भाजप नेते सातत्याने स्त्रीयांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. ही हिंदू धर्माची शिकवण नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली आगपाखड व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या की, रश्मी ठाकरे या कधी लाईन लाईफमध्ये नसतात. रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. ते सहन केले जाणार नाही. मात्र, अमृता फडणवीस सतत ॲक्टीव आणि लाईन लाईफमध्ये असतात. त्यांना विरोधी पक्षनेत्या बणवणार का, असा सवालही त्यांनी केला. जर भाजपचे नेते असंच बोलणार असतील तर आम्ही पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
इतर बातम्याः
India vs South Africa: कोणाला बसवायचं, कोणाला खेळवायचं? कोहली-द्रविड जोडी समोर मोठा पेच