PM Modi TV9 Interview : दोन प्रश्न अन् त्याचं बेधडक उत्तर… महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत चर्चा; मोदींकडून तोच व्हिडीओ ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला आहे. मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं आहे. तर बाळासाहेबांचं स्मरणही केलं आहे. या शिवाय उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना फोन करून त्यांची विचारपूस कशी करायचो, याची माहितीही पहिल्यांदाच दिली आहे. त्यामुळे या मुलाखतीची संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात जोरदार चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 नेटवर्कला महामुलाखत दिली. या मुलाखतीने खळबळ उडाली आहे. मोदींनी या मुलाखतीतून देशाच्या परिस्थितीवर भाष्य करतानाच अनेक राजकीय मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. शरद पवार यांचा पक्ष फुटला हे त्यांच्या घरातील भांडण असल्याचं त्यांनी सांगितलं. तर उद्धव ठाकरे हे आजारी असताना त्यांना फोन करून तब्येतीची विचारपूस करायचो हेही मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे कुटुंबावर भरभरून भाष्य केलं. अन् त्यांच्या या विधानाची आता महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत चर्चा रंगली आहे. मोदी यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे.
टीव्ही9 नेटवर्कच्या पाच संपादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राऊंड टेबल मुलाखत घेतली. यावेळी टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी नरेंद्र मोदी यांना प्रश्न केले. उमेश कुमावत यांनी विचारलेल्या प्रश्नांना मोदींनी उत्तर दिलं. मोदींनी जे उत्तर दिलं त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मोदींच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेश कुमावत यांनी विचारलेल्या प्रश्नांचे दोन व्हिडीओ आपल्या X अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
पहिल्या व्हिडीओत काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयीचा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आणि तुमचे चांगले ऋणानुबंध होते. बाळासाहेब तुमच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले होते. आता बाळासाहेब नाहीत. तुम्ही उद्धव ठाकरे यांना त्यांचा उत्तराधिकारी मानता का? असा सवाल संपादक उमेश कुमावत यांनी विचारला. त्याला मोदींनी अत्यंत मोकळेपणाने उत्तर दिलं.
दोन गोष्टी आहेत. बायोलॉजिकली ते बाळासाहेबांचे पूत्र आहेतच. यात वादच नाही. जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते. तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी वहिनीला रोज फोन करून त्यांची प्रकृतीची माहिती विचारायचो. ऑपरेशन पूर्वी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. म्हणाले, भाईसाब काय सल्ला आहे? ऑपरेशन करू की नको? मी म्हटलं, तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या.
बालासाहेब का मेरे लिए जो स्नेह और प्रेम था, उसे मैं कभी भूल नहीं सकता। pic.twitter.com/xdGJz2BnRA
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2024
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. ते माझे शत्रू नाही. उद्या संकट आलं तर त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल. एक कुटुंब म्हणून मी त्यांच्या पाठी असेल. बाळासाहेबांच्या विचारांसाठी मी जगेल. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज कधीच विसरु शकत नाही. आमच्याकडे सर्वाधिक आमदार आहे. तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. ती मी बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे, असं मोदी म्हणाले.
दुसऱ्या व्हिडीओत काय?
निवडणुकीचे दोन टप्पे संपले आहे. आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळत आहोत. पण नीती आणि मुद्द्यांवरून निवडणूक भटकत असल्याचं दिसतं. तुमच्यावर व्यक्तिगत हल्ले होत आहेत. तेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने तुम्हाला कोब्रा म्हटलं. संजय राऊत यांनी तुम्हाला रावण म्हटलं. औरंगजेबाचा जन्म तुमच्या गावाच्या जवळच झाल्याचंही म्हटलं होतं. अनेक व्हिडीओ येतात, त्यात तुकडे तुकडे करू म्हटलं जातं. तुम्ही या विधानांकडे कसं पाहता? असा दुसरा सवाल उमेश कुमावत यांनी मोदींना विचारला होता. त्यावरही मोदींनी अत्यंत स्पष्टपणे उत्तर दिलं.
मोदी के लिए नई-नई गालियों की तलाश में अब कांग्रेस को रिसर्च टीम बनानी पड़ेगी! pic.twitter.com/VcDNtb8m1F
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2024
मला चिंता ही आहे की डिक्शनरीतील सर्व शिव्या संपल्या आहेत. आता ते बिचारे करणार काय? मोदींसाठी नव्या शिव्या शोधण्यासाठी आता त्यांना रिसर्च टीम तयार करावी लागेल. कारण सर्व डिक्शनरी त्यांनी मला शिव्या देण्यासाठी वापरली आहे. एका व्यक्तीला सार्वजनिक जीवनात एवढी घाणेरडी, इतक्या मोठ्या आणि एवढ्या वेळेस शिव्या खाव्या लागत आहेत. हे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये येईल. पण मी तर परमात्म्यावर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. मी शिवचा उपासक आहे आणि शक्तीचाही उपासक आहे. आणि शिवने तर विष प्यायला शिकवलंय. जर मला अमृताचं संरक्षण करायचं तर विष प्यावं लागेल. माझ्या वाट्याला आलं आहे. मी करेल, असं मोदी म्हणाले.