इंडिया आघाडी की वंचित? उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले आमची तयारी….
मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी हे तुमच्यावर अवलंबून आहे हे दाखवून द्यावे. जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली की त्यांनी अवाजवी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महत्व दिले ती तुम्ही करू नका. हा निर्णय तुम्ही घ्या.
मुंबई | 22 ऑक्टोंबर 2023 : मराठ्यांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे निजामी मराठा आणि दुसरा रयतेतला मराठा. निजामी मराठा हा सत्तेतला मराठा आहे. तर, रयतेतला मराठा हा मातीतला आहे. आता सत्ताधारी मराठ्याकडून मातीतल्या मराठ्याला हिणवले जात आहे. EWS हा जो प्रकार आहे तो मराठा समाजाच्या गळी उतरवला जात आहे. शासनाने प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे की मराठा आरक्षण देण्यासाठी एक महिना लागेल. दोन महिने लागेल. शासन काही खुलासा करत नाही त्यामुळे लोकांमध्ये चीड निर्माण होत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
शासनाने खेळू नये
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जी गर्दी होत आहे त्यामध्ये मराठी तरुणांचे प्रमाण जास्त आहे. याचे कारण म्हणजे मराठा समाजामध्ये २५ ते 30 मधील जो तरुण आहे तो बेरोजगार आहे. 30 ते 40 या वयातील मुलांचे लग्न होत नाहीत. त्याची शेती असली तरी त्यांना आपली मुलगी देण्यास कुटुंब तयार नाही. तो बेरोजगार आहे अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे पाटील यांच्यामुळे आरक्षण मिळेल. त्यामुळे नोकरी मिळेल आणि आपले जीवन सुरळीत सुरु होईल अशी आशा तरुणांना आहे. म्हणून शासनाने त्यांच्याशी खेळू नये, असे आंबेडकर म्हणाले.
त्या भाजपच्या नेत्याला पकडा
बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने एका महिलेची धिंड काढली. फक्त धिंड काढली नाही तर त्याचा व्हिडीओ काढला. भाजपच्या गावगुंडाला तिच्याकडे असलेली जमीन हवी होती. ही जी घटना घडली त्याचा निषेध करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असे आवाहन करत आहोत की त्या भाजपच्या नेत्याला पकडा आणि महिलांचा आदर करतो हे दाखवून द्या. एकनाथ यांनी त्या नेत्याला अटक करून मुख्यमंत्रीपदाचा मान राखावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर कारवाई करणार नाही त्यामुळे तुम्हाला हे आवाहन करतो असे ते म्हणाले.
जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली
भाजप सत्तेवर आल्यानतर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अनेक महिला राज्यातून गायब झाल्या. त्यावर गृहमंत्री फडणवीस काहीच बोलणार नाहीत. परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी हे तुमच्यावर अवलंबून आहे हे दाखवून द्यावे. जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली की त्यांनी अवाजवी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला महत्व दिले ती तुम्ही करू नका. हा निर्णय तुम्ही घ्या. जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर भाजप हा पक्ष रेपिस्ट पक्ष आहे असा स्टॅप मारायला आम्ही मोकळे आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मुंबईतल्या सहाच्या सहा जागा लढवू.
मविआमधील तीन पक्ष वर्ष, सव्वा वर्ष होऊनही लोकसभेच्या जागेची चर्चा करत नाही. ही समिती नेमली, ती समिती नेमली असेच म्हणत आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडीतील एक पक्ष समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्याबद्दल कॉंग्रेस जी भाषा वापरत आहे. त्यामुळे आम्हाला काहीं बोध घ्यायचा आहे तो आम्ही घेत आहोत. इंडिया आघाडीसोबत आमची युती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. पण, जर युती झाली नाही तर आम्ही मुंबईतल्या सहाच्या सहा जागा लढवू. त्यानुसार कार्यकर्त्यांना तयार करत आहोत. 2 लाख मतदानापर्यंत कशा पद्धतीने पोहोचले पाहिजे याचा आराखडा बांधत आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जागावाटपाची चर्चा झाली पाहिजे
इंडिया आघाडीमध्ये कुणाला घ्यायचे आणि कुणाला नाही त्याचा निर्णय ते घेतील. त्यांचे निमंत्रण आले तर आम्ही जाऊ. जर निमंत्रण आले नाही तर त्यांना आम्हाला सोबत घ्यायचे नाही हा संदेश येतो. त्यांनी जर उद्धव सेनेला म्हटले की आमच्यासोबत आहात की की वंचित सोबत आहात. जर त्यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याची भूमिका घेतली तर आम्हाला आमचा विचार करावाच लागेल त्यानुसार आम्ही तयारी करत आहोत. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणूक लागू शकते. त्यासाठी जागावाटपाची चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.