नांदेड पोटनिवडणुकीत कोण लढणार?; प्रतापराव चिखलीकर म्हणाले, रावसाहेब दानवे…
Prataprao Chikhalikar on Nanded Loksabha By Election : खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं. त्यानंतर रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघातून कोण लढणार? यावर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भाष्य केलंय. वाचा.....
काँग्रेसचे नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं 26 ऑगस्टला निधन झालं. त्यानंतर नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक होईल. तेव्हा या ठिकाणी कोण निवडणूक लढणार? काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार? भाजप कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उमेदवारीहबाबतचे संकेत दिलेत. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. रावसाहेब दावने ठरवतील कोण या जागेवर लढणार, असं प्रतापराव पाटील म्हणाले.
पोट निवडणुकीबाबत चिखलीकर काय म्हणाले?
पक्षश्रेष्ठी सांगतील तो आदेश मला मान्य राहील. मला काय एवढी घाई नाही. निश्चितपणे निवडणूक लढवायची कुठे लढवली पाहिजे, हे पक्षश्रेष्ठ सांगतील. भारतीय जनता पक्ष पोटनिवडणूक लढवणार आहे की नाही हे मला माहित नाही. पक्षश्रेष्ठी जो मला निर्णय देतील तो मला मान्य आहे, असं प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.
मी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्नेह मेळावा घेतला. मित्र म्हणून संजय शिरसाट यांनी मी विधानसभेत यावं ही भूमिका मांडली. मित्र म्हणून भुमरे मामांनी दिल्लीत यावं म्हणून भूमिका मांडली. मी सांगितलं की, मी मुंबईत राहावं की दिल्लीत राहावं हे विचारपीठावर उपस्थित असलेले रावसाहेब दानवे ठरवतील…, असं प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणालेत.
प्रताप चिखलीकरांकडून नुकसानीची पाहणी
धो-धो कोसळलेल्या पावसामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाणी गावांमध्ये पाणी शिरलं. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाहणी केली.
नदी – नाले काठोकाठ भरून ओव्हरफ्लो होत आहेत. यावत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोललो आहे. 100% नुकसान झाल आहे त्यामुळे सरसकट मदत द्यावी अशी मागणी आहे. अतिशय भयानक परिस्थिती आहे शेतकरी बैचन झाला आहे. त्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे, असंही प्रतापराव पाटील चिखलीकरांनी म्हटलं आहे.