Shivaji Maharaj | कुठं पुतळ्याचं दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला बांगड्यांचा हार, शिवभक्त आक्रमक
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद पडताना दिसत आहे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue dispute).
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगावाील मनगुत्ती गावातून चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्यानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद पडताना दिसत आहे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue dispute). राज्यात कोल्हापूरसह सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, जालना, नांदेड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शिवभक्त आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने महाराष्ट्रातील संतप्त शिवभक्त कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत.
मनगुत्तीमधील मुख्य चौकातही महिला आणि नागरिकांनी एकत्र जमून याचा विरोध केला. राज्यात मराठा क्रांती मोर्चापासून अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरुन याविरोधात आंदोलन केलं. तसेच कर्नाटकमधील भाजप सरकारचा निषेध केला.
बेळगावच्या मनगुत्तीमधील मुख्य चौकात सकाळपासून महिला आणि नागरिकांनी एकत्र जमून याचा विरोध केला. यानंतर पोलिसांकडून नागरिकांना हटवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पुतळा हटवल्यानं महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्येही संताप बघायला मिळत आहे. मराठा क्रांती मोर्चा, श्रीराम सेनेसह अन्य काही संघटनाचे पदाधिकारी आज मनगुत्ती गावात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पत्र लिहून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सन्मानपूर्वक त्या जागेवर बसवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मनगुत्ती गावातील प्रमुखांनी हा वाद मिटल्याचा दावा केला आहे. तीन गावाच्या बैठकीनंतर पुतळा आहे त्या ठिकाणीच बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात आलं.
स्थानिक प्रशासनाने पुतळा हटवला नसून काही परवानग्या बाकी असल्यानं सन्मानपूर्वक बाजूला ठेवल्याचा दावा केलाय.
सोलापूर
सोलापूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. तसेच भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
अहमदनगर
अहमदनगरमध्ये शिवसैनिकांकडून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचंही दहन करण्यात आलं. कर्नाटक सरकारच्या पुतळ्याला बांगड्यांचा हार घालून त्यांचं दहन करण्यात आलं. राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी प्रदर्शन केलं.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये महिलांनी चौकात जमून जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष केला. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला आंदोलनावर ठाम राहिल्या. यानंतर पोलिसांनी जादा कुमक मागवून आंदोलनकर्त्यांना तेथून पांगवले.
जालना
छावा क्रांतीवीर सेनेकडून कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचे दहन करण्यात आलं. बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, कर्नाटक मुख्यमंत्र्यांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
नेमकं प्रकरण काय?
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.
सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
Shivaji Maharaj | बेळगावात शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला, कन्नडीगांचं संतापजनक कृत्य
Chhatrapati Shivaji Maharaj Statue dispute