भयानक ! रायरेश्वर पठारावरून उतरत होता, अचानक तोल गेला अन् तो खोल दरीत…
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवप्रतिष्ठानच्या किल्ले रायरेश्वर ते किल्ले प्रतापगड गडकोट मोहिमेदरम्यान, रायरेश्वर पठारावरून उतरताना खोल दरीत पडल्यानं शिवप्रतिष्ठानच्या धारकरी तरुणाचा..
विनय जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, भोर, पुणे | 27 जानेवारी 2024 : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवप्रतिष्ठानच्या किल्ले रायरेश्वर ते किल्ले प्रतापगड गडकोट मोहिमेदरम्यान, रायरेश्वर पठारावरून उतरताना खोल दरीत पडल्यानं शिवप्रतिष्ठानच्या धारकरी तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रायरेश्वर पठारावरून कोर्ले गावच्या बाजूने – धारकरी तरुण पाऊलवाटेने उतरत असताना ही दुर्घटना घडली. सागर पांडुरंग वाईगडे असं मृत्यू झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव असून तो कोल्हापूर जिल्यातील हुपरी हातकणंगले येथून गडकोट मोहीमेसाठी आला होता. स्थानिक सह्याद्री रेस्क्यू टीमच्या जवानांना 3 तासांच्या शोधमोहिमेनंतर सागर पर्यंत पोहचण्यात यश आलं. पण गंभीर जखमी झाल्याने सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं ?
भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावरून उतरताना दुपारी गडकोट मोहिमेतील धारकरी तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला. सागर या अवघा 23वर्षांच्या मुलाचं आयुष्य क्षणात संपलं. या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या दुर्घटनेबाबत रोहन राजेंद्र गोंधळी याने पोलीसांना माहिती दिली. रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहिमेसाठी हुपरी येथून तेरा तरुण बुधवारी पठारावर मुक्कामी आले होते. कोर्ले गावच्या बाजूने – धारकरी तरुण पाऊलवाटेने उतरत होते. दरम्यान, सागरचा पाय घसरून तो खोल दरीत कडयाच्या बाजूला पडला. त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याचा शोध घेतला पण तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. सागरला उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान , शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या किल्ले रायरेश्वर ते किल्ले प्रतापगड गडकोट मोहिमेला पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरून गुरुवारी सुरुवात झाली. गडावर तुळजा मातेची आरती करत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरातून आलेले शिवप्रतिष्ठानचे हजारो धारकरी या मोहिमेत सहभागी झालेत. दऱ्या खोऱ्यांचा अवघड मार्ग सर करत रविवारी 28 जानेवारीला मोहीम महाबळेश्वर जवळील प्रतापगडावर पोहोचणार आहेत. देशभक्त, धर्मभक्त ध्येयवादी तरुण पिढी घडावी यासाठी दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात येतं.