Breaking | संजय राऊत यांना धमकी प्रकरणी एकजण ताब्यात, मुंबई आणि पुणे पोलिसांची संयुक्त कामगिरी, कोण आहे तो?
पुण्यातून ताब्यात घेतलेला तरुण 23 वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच सदर प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
अभिजित पोते, पुणे : शिवसेना (Shovsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मिळालेल्या धमकी प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या केसमध्ये पुणे पोलिसांनी काल रात्री उशीरा एकाला ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीचे मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिस तत्काळ अलर्ट झाली. या मागे नेमकं कोण आहे, हे शोधून काढण्यासाठी वेगाने तपास सुरु झाले. मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. मुंबईतील गुन्हे शाखेच्या मदतीने पुणे पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी काल रात्री उशीरा एकाला ताब्यात घेतलंय. या संशयित आरोपीला घेऊन मुंबई पोलिस पुण्याहून मुंबईतदेखील दाखल झाले आहेत. ताब्यात घेतलेला तरुण 23 वर्षांचा आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच सदर प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
कुणाला ताब्यात घेतलं?
संजय राऊत यांना धमकी प्रकरणी एका तरुणाला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. राहुल तळेकर (साधारण वय 23) याला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतले. पुण्यातील खराडी भागात पोलिसांनी ही कारवाई केली. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून या तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं.मुंबई पोलिसांनी माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी कारवाई करत लगोलग या तरुणाला ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपवलं. मुंबई पोलीस या तरुणाला घेऊन रात्रीच रवाना झाले आहेत. तळेकर सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात..
संजय राऊतांचा इशारा
देशात सुरु असलेल्या धमक्यांचं सत्र आणि दंगलींमागे भाजपचा हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. माझी सुरक्षा हटवली, त्याबद्दल मी कुणाला पत्र लिहिलं नाही. पण वारंवार मुख्यमंत्र्यांचा मुलगा एक षडयंत्र रचतो. एका गुंडाला हाताशी धरून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचतो, त्याची माहिती दिली तर गृहमंत्री याला स्टंट म्हणतात. ज्या गँगने सलमान खानला धमकी दिली, त्याच गँगने आता मला धमकी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना पकडलं आहे. धमक्यांची माहिती दिली तर गृहमंत्री चेष्टा करतात. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर केला जातोय, असंच चालत राहिलं तर आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊ, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.