ST Employees : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुण्याच्या भोर डेपोतले 11 कर्मचारी कामावर
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees) मुंबई उच्च न्यायालयाने (High court) 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागील दोन दिवसात पुण्यातील भोर (Bhor) डेपोमधील 11 कर्मचारी कामावर परतले आहेत.
पुणे : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees) मुंबई उच्च न्यायालयाने (High court) 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागील दोन दिवसात पुण्यातील भोर (Bhor) डेपोमधील 11 कर्मचारी कामावर परतले आहेत. तर एकाच दिवसात 42 बडतर्फ कर्मचाऱ्यांनी बडतर्फीची कारवाई मागे घेण्यासाठी महामंडळाकडे अपील केले आहे. आतापर्यंत डेपोमधील एकूण 66 कर्मचारी कामावर परतले आहेत. आतापर्यंत भोर डेपोमधील 228पैकी 66 कर्मचारी कामावर परतले आहेत. यामध्ये 20 चालक आणि 23 वाहकांचा समावेश आहे. तर संपादरम्यान डेपोमध्ये 9 खासगी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संप सुरू झाल्यापासून डेपोतील 61 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. त्यापैकी 6 जण बडतर्फी मागे घेण्यासाठीचे अपील करून याआधीच कामावर रुजू झाले आहेत. तर आज एकाच दिवशी 42 कर्मचाऱ्यांनी बडतर्फी मागे घेण्यासाठी अपील केले आहे.
हळू हळू कर्मचारी पुन्हा होतायत रुजू
भोर डेपोतील 61 जणांवर बडतर्फीची, 59 निलंबनाची तर 11 जणांवर बदलीची कारवाई करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हळू हळू कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होताना पाहायला मिळत आहेत. संप सुरू झाल्यापासून भोर आगाराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कायद्यानुसार कारवाई – परब
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांवर कायद्यामधल्या तरतुदींनुसार कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 तारखेपर्यंत रुजू होण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली. एसटी पूर्णक्षमतेने कशी चालू करायची यासंदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा केली. कायदा ज्यांनी हातात घेतला त्यांनी कोर्टाचा अपमान केलाय. त्यामुळे नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल, असे अनिल परब म्हणाले.