पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा
Scholarship Exam | कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला ही परीक्षा 8 ऑगस्टला होणार होती. मात्र, यादिवशी केंद्रीय पोलीस दलाची परीक्षा असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख 9 ऑगस्ट करण्यात आली होती.
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. यापूर्वीही ही परीक्षा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली होती.
कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला ही परीक्षा 8 ऑगस्टला होणार होती. मात्र, यादिवशी केंद्रीय पोलीस दलाची परीक्षा असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख 9 ऑगस्ट करण्यात आली होती. मात्र, आता ही परीक्षा आणखी तीन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.
यापूर्वी परीक्षा दोन वेळा लांबणीवर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात परीक्षा लांबणीवर टाकली गेली होती.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोनामुळं परीक्षा पुढे ढकलली होती.
6 लाख 32 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
राज्यातील 47 हजार 612 शाळांमधील 6 लाख 32 हजार 478 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी 3 लाख 88 हजार 335 तर आठवीच्या वर्गासाठी 2 लाख 44 हजार 143 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.
संबंधित बातम्या:
परदेशात शिक्षणासाठी निवास आणि भोजनाच्या खर्चासह शिष्यवृत्ती; 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी
सावखेड्याच्या जिल्हा परिषद शाळेची जळगावात चर्चा, ‘ओट्यावर शाळा’ उपक्रमाद्वारे शिक्षणाची गाडी सुसाट