Pune crime : चार महिन्यांच्या चिमुरडीला रिक्षात सोडून पालक गायब; पुण्यातल्या भोरच्या कमर अली दरवेश दर्गा परिसरातली घटना
आजूबाजूला बाळाच्या आई वडिलांची शोधाशोध त्यांनी केली. तिथे कोणीच त्या बाळाची जबाबदारी घेताना आढळले नाही. त्यानंतर त्यांनी लागेच राजगड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बाळाला ताब्यात घेतले.
भोर, पुणे : पुण्यातील खेड शिवापूर येथील प्रसिद्ध कमर अली दरवेश दर्गा परिसरात चार महिन्यांच्या चिरमुडीला रिक्षात सोडून पालक गायब झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. खेड शिवापूरच्या राजगड पोलिसांकडून अज्ञात पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्त्री जातीच्या अर्भकाला (Infant) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे अर्भक सोफोश संस्थेमध्ये दाखल करण्याची प्रकिया पोलिसांकडून (Police) सुरू करण्यात आली. पुण्यातील खेड शिवापूर येथील प्रसिद्ध कमर अली दरवेश दर्गा परिसरात हा प्रकार घडला आहे. पुण्यातील तोफीक शेख हे कुटुंबासह खेड-शिवापूर येथील कमर अली दरवेश या प्रसिद्ध दर्गा येथे सायंकाळी दर्शनासाठी आले होते. दर्गा (Dargah) येथील वाहनतळावर रिक्षा लावून दर्शनाठी गेल्यानंतर साडेनऊच्या सुमारास ते परत आले. त्यावेळी रिक्षामध्ये त्यांना अंदाजे चार महिना वयाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले.
आई-वडिलांचा शोध घेतला, पण…
आजूबाजूला बाळाच्या आई वडिलांची शोधाशोध त्यांनी केली. तिथे कोणीच त्या बाळाची जबाबदारी घेताना आढळले नाही. त्यानंतर त्यांनी लागेच राजगड पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन बाळाला ताब्यात घेतले. त्यानंतर बाळाला सोफोश संस्थेत दाखल करण्यात आले.
सोफोश संस्थेविषयी
कुमारी मातांना झालेल्या आणि सार्वजनिक स्थळी सापडलेल्या निराधार बालकांना हक्काचे घर आणि प्रेम व माया देणारे आई-बाबा मिळवून देण्याचे काम सोफोश (सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ दी ससून) ही संस्था गेल्या 55 वर्षांपासून अविरतपणे करत आहे. ही एक शासनमान्य सेवाभावी संस्था आहे. 55 वर्षांपूर्वी ससून रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी द्रविड आणि हर्शिला मनसुखानी यांनी रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या मदतीसाठी अधिष्ठाता डॉ. मेंडोंसा यांच्या मार्गदर्शनाखाली 1964मध्ये ‘सोफोश’ची स्थापना केली. येथे बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचे संगोपन केले जाते.