पाच मित्र नदीवर पोहायला गेले होते, पण मित्रांसोबतची ही मजा त्याची अखेरची ठरली, पोहता पोहता दम लागला अन्…
पाच मित्र नीरा नदीत पोहण्याचा आनंद घ्यायला गेले. पण त्यांना कुठं माहित होतं हा आनंद त्यांच्याच मित्राच्या जीवावर बेतेल. मित्रांनी आरडाओरडा करुन आपल्या मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. पण नियतीच्या मनात वेगळेच होते.

विनय जगताप, पुणे : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्याच्या भोर तालुक्यात घडली आहे. भोर तालुक्यातील शिंद गावात नीरा नदीत पोहताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निशिकांत संभाजी मोहिते असं मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. नदी पात्रात पोहताना दम लागलल्याने बुडून मृत्यू झाला. मित्राला बुडताना पाहून मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. निशिकांतच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मित्रांसोबत पोहायला नदीवर गेला
महूडे खोऱ्यातील शिंद, भोर येथील पदवीधर असणारा तरुण निशिकांत संभाजी मोहिते हा तरुण चार मित्रांसोबत सोमवारी सायंकाळी नीरा नदी पात्रात पोहायला गेला होता. पोहत असताना निशिकांतला दम लागल्याने तो नदीत बुडू लागला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी त्याला बुडताना पाहून आरडाओरडा केला.
तरुणाला शेतकऱ्यांनी तात्काळ बाहेर काढले पण…
तरुणांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे शेतकरी तात्काळ घटनास्थळी धावले. शेतकऱ्यांनी पाण्यात उडी घेत तरुणाला पाण्यातून बाहेर काढले. यानंतर तरुणाला तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे शिंद-महुडे परिसरात शोककळा पसरली आहे.
नांदेडमध्ये गोदावरी नदीत दोघे बुडाले
नांदेडच्या आयटीआय कॉलेजचे सात विद्यार्थी पोहण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेले होते. यावेळी पोहत असताना दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शंकर कदम आणि शिवराज कदम अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या विद्यार्थ्याचा पोहता येत नसल्याने मृत्यू झाला आहे. दोघांचेही मृतदेह नदीच्या बाहेर काढण्यात आले असून, या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.