राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आप एन्ट्री करणार, भक्तीपीठ ते शक्तीपीठ ही स्वराज्य यात्रा उद्या बारामतीत
भाजपने बारामतीत सुरुवातीला लक्ष केंद्रीत केलं. आता त्यांच्यापाठोपाठ आपने बारामतीत स्वराज्य यात्रा काढत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर लक्ष दिलं.
प्रतिनिधी, पुणे : बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, या बालेकिल्ल्यावर मध्यंतरी भाजपनं लक्ष केंद्रीत केलं. केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीला भेट दिली. भाजपच्या बैठका घेतल्या. त्यामुळे भाजपने बारामतीत सुरुवातीला लक्ष केंद्रीत केलं. आता त्यांच्यापाठोपाठ आपने बारामतीत स्वराज्य यात्रा काढत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर लक्ष दिलं. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला कुणाला पसंती देणार, हे येणारी वेळच सांगेल. यातून राष्ट्रवादीला सक्रिय होणे आवश्यक आहे हे दिसून येते.
आपची बारामतीत उद्या सायंकाळी सभा
आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा उद्या बारामती लोकसभा मतदार संघात धडकणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका, नेहरू चौक, खडकपुरा, बाबा चौक, मार्गे शहरातील इंदापूर नगर परिषद समोर सभा होणार आहे. अशी माहिती पुणे जिल्हा संघटन मंत्री अक्षय शिंदे यांनी दिली. त्यानंतर ही यात्रा भिगवण, दौंडमार्गे बारामतीत सायंकाळी जाणार आहे.
पंढरपुरातून झाली सुरुवात
आप पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेची सुरवात आज रविवारी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन सुरू झाली आहे. तर रायगड येथे राज्याभिषेक दिनी (ता. ६) स्वराज्य यात्रेची सांगता होणार आहे.
सात जिल्ह्यात जाणार यात्रा
ही यात्रा सात जिल्ह्यात जाणार असून या जिल्ह्यातील शहरे आणि गावांमध्ये सभा होणार आहेत. तब्बल ७८२ किलोमीटरचा प्रवास यात्रेच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत आपचे अक्षय शिंदे यांनी दिली.
आपचे मिशन बारामती आहे काय
उद्या ही स्वराज्य यात्रा उद्या बारामतीत आल्यानंतर त्या ठिकाणी उच्च शिक्षित तरुण, वकील, शिक्षक, इंजिनीयर यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आम आदमी पार्टीचे लोकसभा निवडणुकीतील लक्ष हे मिशन बारामतीत आहे की काय अशीच चर्चा रंगत आहे.