Baramati MNS : बारामतीतही ‘भोंगे’; राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेनं केलं हनुमान चालिसा पठण
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजवण्याचे आव्हान दिले. त्यानंतर बारामतीतदेखील (Baramati) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान चालीसा लावण्यात आला.
बारामती, पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाजवण्याचे आव्हान दिले. त्यानंतर बारामतीतदेखील (Baramati) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान चालीसा लावण्यात आला. हनुमान जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यालगत असलेल्या मारुती मंदिरात मारुती स्तोत्र पठण केले. त्यानंतर येथे लावण्यात आलेल्या भोंग्यावर हनुमान चालीसा वाजविण्यात आला. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी दिले होते. त्याच्या पुनरुच्चार उत्तर सभेतदेखील त्यांनी केला होता. या निर्णयाची बारामतीत अंमलबजावणी होते का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बारामतीत सामाजिक सलोखा गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो. आज हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालीसा लावण्यात आला आहे. यातून कोणताही तणाव निर्माण करण्याचा उद्देश नाही, असे स्पष्टीकरण अॅड. पाटसकर यांनी यावेळी दिले.
पुण्यातही कार्यक्रम
राज ठाकरेंच्या हस्ते आज हनुमानाची आरती होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे सामुदायिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला लावणार हजेरी लावणार आहेत. खालकर चौकातील हनुमान मंदिरात ही आरती होणार आहे. यानिमित्त मनसेने कुमठेकर रस्त्यावर जोरदार वातावरणनिर्मितीही केली आहे. हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.