गोविंदबागेतल्या पाडव्याला अजितदादांची दांडी, राज्यभरात चर्चेला उधाण, शरद पवारांनी खरं कारण सांगितलं!
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदाही साजरा होतोय. पण या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती आहे.
बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसंच संपूर्ण पवार कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदाही साजरा होतोय. पण या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती आहे. सकाळपासून राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला होता. पण स्वत: शरद पवार यांनी पाठीमागील कारण स्पष्ट केलं आहे.
गोविंदबागेत पवारांचा पाडवा
प्रथा परंपरेनुसार बारामतीच्या गोविंदबागेत प्रत्ये वर्षी पवार कुटुंबिय हितचिंतकांच्या स्नेहभेटी घेतात. दिवाळी पाडव्याच्या संपूर्ण दिवशी हा कार्यक्रम रंगतो. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित असतात. तर राज्यभरातून विविध नेते, खासदार-आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते गोविंदबागेकडे कूच करत असतात. एकंदरितच या कार्यक्रमाची आठवडाभर अगोदरच तयारी सुरु असते. प्रत्येक वर्षी हा अजितदादांच्या अचूक नियोजनाखाली पार पडतो. पण या वर्षी तेच कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. याच चर्चांवर शरद पवार यांनी खुलासा केला.
ड्रायव्हरला कोरोनाची लागण, अजितदादांची कोरोना टेस्ट बाकी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ड्रायव्हरला कोरोना झाल्याने अजितदादांनी आजच्या कार्यक्रमाला येणं टाळलं. ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्यानंतर अजितदादांनीही कोरोना टेस्ट केलीय. त्यांचा कोरोना अहवाल येणं अद्याप बाकी आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
दोन चालक आणि तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आलेत. त्यांच्याही टेस्ट केल्या गेल्या आहेत. त्यांनीही कोरोनाची शक्यता वर्तवली आहे. आज इतके सारे लोक येणार, भेटीगाठी घेणार, उगीच धोका नको म्हणून ते आज कार्यक्रमाला आले नाहीत, असं पवारांनी सांगितलं.
कार्यकर्ते-पवारांचा स्नेहभेटीचा कार्यक्रम
शरद पवार यांनी आज दिवाळी निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. गोविंद बागेतली त्यांच्या घरी कार्यकर्त्यांनी पवारांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर पवारांनी मीडियाशी संवाद साधला.
पवार म्हणाले, “कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. यंदाची दिवाळी लोकांना साजरी करता यावी या विचारात आम्ही होतो. त्यामुळे काही निर्णय घेतला. लोकांनी काही सूचना आल्या. आम्ही मास्क लावू, शिस्त पाळू पण दिवाळी साजरी करू द्या अशा सूचना केल्या. नागरिकांनी तशा सूचनाही पाळल्या. या संकटाच्या वर्षातून आपण बाहेर निघत आहोत. आपण नेहमीचा कारभार नेहमीप्रमाणे करू. गेल्या दोन वर्षात झालेलं नुकसान भरून काढू. अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था आपण सावरू. नव्या दमाने आपण पुन्हा एकदा कामाला लागू असा विश्वास आहे”
हे ही वाचा :
अरे काही तरी चांगलं बोला; ईडी, आयकराच्या चौकशीवर शरद पवार यांचं सूचक मौन