शरद पवार यांच्या भेटीपूर्वी अजित पवार अन् जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा, राजकीय गटात उत्सुक्ता
Sharad pawar and Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज गर्दी होती. परंतु जयंत पाटील त्यांना भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक शनिवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. त्या ठिकाणी शरद पवार अन् अजित पवार एकत्र भेटणार आहेत. दरम्यान, या भेटीपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. ते अजित पवार यांच्या गटात येणार असल्याचे म्हटले जाते. परंतु या चर्चांना जयंत पाटील यांनी अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, राजकीय गटात याबाबत चर्चा थांबत नाही. आता शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुण्यात होत आहे. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्या बैठकीत शरद पवार-अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. त्यापूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड गुप्तगू झाले.
जयंत पाटील येताच सर्वांना काढले बाहेर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देण्यासाठी आज गर्दी होती. परंतु जयंत पाटील त्यांना भेटण्यासाठी आल्यावर अजित पवार यांच्या कक्षात असलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. सुरक्षा रक्षकांनाही बाहेर काढण्यात आले. अजित पवार यांच्या स्वीय सहायकांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बंद दाराआड चर्चा सुरु झाली.




वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीसाठी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर असे साखर उद्योगातील नेतेही दाखल झाले आहेत. या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार भेटणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होतो का? जयंत पाटील यांच्या बंद दारआड झालेल्या चर्चेनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.