Ajit Pawar | अजित पवार यांना पालकमंत्रीपद मिळाले…पण अधिकार नसणार?
Pune Ajit Pawar News | पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळत नसल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. अखेर बुधवारी अजित पवार यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. परंतु अधिकार नसणार, असा दावा...
पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर भाजप-शिवसेना युतीसोबत गेले. त्यानंतर त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ जणांना मंत्रीपद देण्यात आले. २ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यानंतर अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले नव्हते. अखेर बुधवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही जणांना पालकमंत्रीपद देण्यात आले. अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले.
पुणे पालकमंत्रीपदाचा होता वाद
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. भाजपला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्याकडे हवे होते. त्याचवेळी अजित पवार पालकमंत्री नसताना पुणे जिल्ह्यातील अनेक बैठका घेत होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील नाराज होते. हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेला होता. दुसरीकडे भाजप कार्यकर्ते पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते. या सर्व वादात पुण्याचे पालकमंत्रीपद मिळत नसल्यामुळे अजित पवार नाराज होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीस ते गेले नसल्याची चर्चा होती. त्यानंतर बुधवारी अजित पवार यांनी पालकमंत्रीपद देण्यात आले.
पालकमंत्रीपद दिले पण अधिकार नसणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पद मिळाले आहे. परंतु भारतीय जनता पक्षाकडून अजित पवार यांना पालकमंत्री पदाचे अधिकार दिले जाणार नाही. तसेच पुणे महापालिकेच्या सत्ताकाळात भाजपने केलेला भ्रष्टाचार अजित पवार बाहेर काढणार नाहीत. असा दावा शरद पवार गटाने केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या जागी अजित पवार यांची वर्णी लागल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढल्याचा खोचक टोला ही शरद पवार गटाने लावला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी हा टोला लगावला आहे.
शरद पवार गटाकडून केलेल्या या आरोपानंतर आता अजित पवार गट काय उत्तर देणार? याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी चंद्रकांत पाटील गुरुवारी पुण्याचे पालकमंत्री म्हणून शेवटची बैठक घेणार आहे.